वंचितशी आघाडी काँग्रेसला पडली भारी! 62 जागा दिल्या, पण 16 जागांवर उमेदवारच नाहीत; बंडखोरांना पाठिंबा देण्याचा नाइलाज 

मुंबई महानगरपालिका  निवडणुकीसाठी काँग्रेसने ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले. पण वंचितबरोबरची आघाडी काँग्रेसला भारी पडली आहे. काँग्रेसने वंचितला 62 जागा दिल्या. मात्र त्यातील 16 जागांवर वंचितने उमेदवारच दिलेले नाहीत. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली तेव्हा हा प्रकार समोर आला आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कपाळावर हात मारला. आता या 16 ठिकाणी बंडखोरांना पाठिंबा देण्याचा नाइलाज काँग्रेसवर ओढवला आहे.

1999 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस महापालिका निवडणुकीत स्वबळावर आणि वंचितबरोबर आघाडी करून मैदानात उतरली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीच्या बदल्यात काँग्रेसकडून 62 जागा मागितल्या. त्यातील अनेक मतदारसंघात काँग्रेसची एकगठ्ठा मते आहेत. तरीही काँग्रेसने त्या जागा वंचितला सोडल्या. पण वंचितने फक्त 46 जागांसाठीच उमेदवारी अर्ज दाखल केले. उर्वरित 16 जागांसाठी वंचितकडे उमेदवारच नव्हते.

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला यासंदर्भात किंचितही कल्पना दिली असती तर त्या 16 वॉर्डांमध्ये प्रबळ उमेदवार देण्याची क्षमता काँग्रेसकडे होती. त्यांना ‘एबी’ फॉर्म देता आले असते. आता मात्र तेथील स्वपक्षीय बंडखोरांना पाठिंबा देण्याचा एकमेव पर्याय काँग्रेसकडे उरला आहे.

वंचितने जागांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव दिला होता – सचिन सावंत 

वंचित बहुजन आघाडीकडे काही जागांसाठी उमेदवार नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी जागांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र ऐनवेळी अदलाबदल करणे शक्य झाले नाही, असा दावा काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला. वंचितने नेमके किती जागांवर उमेदवार दिले नाहीत याची माहिती नसल्याचे ते म्हणाले.