
‘‘मुंबईत ‘खान’ महापौर होऊ देणार नाही, हिंदू महापौर करणार अशा वल्गना करणाऱ्या भाजपचा महाराष्ट्रद्वेष्टा अजेंडा उघडा पडला. भाजपच्या हिंदू महापौरांमध्ये मराठी माणसाला स्थान नसल्याचे आज स्पष्ट झाले. मुंबईत उत्तर भारतीय महापौर व्हायला हवा,’’ असे वक्तव्य भाजपचे नेते व माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठीजनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मीरा-भाईंदरमध्ये प्रचारासाठी गेलेल्या कृपाशंकर यांनी हे वक्तव्य केले. मुंबई किंवा इतर ठिकाणी उत्तर भारतीय समाजाचा महापौर होणे शक्य आहे का, असे त्यांना विचारण्यात आले. त्यावर ‘‘ते आम्ही शक्य करून दाखवू. आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय समाजाचा महापौर बसेल,’’ असे कृपाशंकर म्हणाले.
मुंबईचा महापौर हिंदू होणार, असे वक्तव्य भाजप नेते सातत्याने करत आहेत. हा हिंदू महापौर मराठी भूमिपुत्र असेल का यावर मात्र भाजपने आतापर्यंत मौन पाळले होते. कृपाशंकर यांच्या वक्तव्यामुळे भाजपची ‘मन की बात’ चव्हाटय़ावर आली आहे. भाजपच्या या भूमिकेवर सर्वच पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे.
वाद होताच सारवासारव
वादाला तोंड फुटताच कृपाशंकर यांनी सारवासारव केली. ‘‘माझे हे वक्तव्य दोन-चार दिवसांपूर्वीचे आहे. त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मला कुठलाही भाषिक वाद निर्माण करायचा नव्हता. आम्ही हिंदी आणि मराठीत फरक करत नाही,’’ असे ते म्हणाले.
महापौर लोकांच्या मताने ठरतो! – काँग्रेस
‘‘भाजपला मतं मिळवण्यासाठी आता अशा पद्धतीने वक्तव्ये करावीच लागणार. उद्या एखादा उत्तर भारतीय जाईल, तो म्हणेल उत्तर भारतीय महापौर बसेल. बिहारी जाईल, तो बिहारी म्हणेल. गुजराती जाईल तर गुजराती म्हणेल. पण मुंबई आणि आसपासचा परिसर हा भाषावाद सहन करत नाही. महापौर हा लोकांच्या बहुमताने ठरतो. कृपाशंकर काय म्हणतात याला अर्थ नाही. ती त्यांच्या पक्षाची भूमिका असेल,’’ असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
हाच भाजपचा खरा चेहरा… सोशल माध्यमांत तीव्र प्रतिक्रिया
कृपाशंकर सिंह यांच्या विधानावर समाजमाध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हाच भाजपचा खरा चेहरा आहे. भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी प्रतिक्रिया एका ‘एक्स’ युजरने नोंदवली. ‘या निवडणुकीत भाजपला मत म्हणजे परप्रांतियांना मत’ हे आता सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे, असे मत एका नेटकऱ्याने व्यक्त केले.
ज्यांना आसरा दिला, ते डोक्यावर नाचायला लागलेत!
मनसेने कृपाशंकर यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘चरितार्थासाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मराठी माणसाने आश्रय दिला आणि हेच लोक आज मराठी माणसाच्या डोक्यावर थयथय नाचायला लागले आहेत. मराठी माणसा आतातरी जागा हो,’ असे आवाहन मनसेने ‘एक्स’ पोस्टमधून केले.





























































