सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक, 3 जानेवारीला कार्यभार स्वीकारणार

वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे बॉस झाले आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून आज गृह विभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. दाते यांना दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. यामुळे दाते यांना पोलीस प्रमुखपदी एक वर्ष अधिकचा कालावधी मिळणार आहे.

1990 च्या तुकडीचे थेट आयपीएस अधिकारी असलेल्या सदानंद दाते यांचीच पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार हे निश्चित झाले होते. आज राज्याच्या गृह विभागाने नियुक्तीचे आदेश जारी करून त्यावर शिक्कामोर्तब केले. दाते हे नियत वयोमानानुसार डिसेंबर 2026 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. परंतु शासनाने दाते यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करतानाच त्यांचा महाराष्ट्र पोलिस प्रमुख पदावरील कार्यकाळ हा पदभार स्वीकारल्यापासून  पुढील दोन वर्षांचा असेल असे नमूद केले आहे. त्यामुळे दाते हे पोलीस महासंचालक पदी दोन वर्षांकरिता कार्यरत राहणार आहेत. यामुळे दाते यांना एक वर्षाचा अधिक काळ पोलीस महासंचालक पद भुषविता येणार आहे. जानेवारी 2028 मध्ये दाते सेवानिवृत्त होतील.

येत्या 3 जानेवारी रोजी रश्मी शुक्ला यांचा पोलीस महासंचालकपदी दोन वर्षांचा शासनाकडून देण्यात आलेला वाढीव कालावधी संपुष्टात येईल. त्यानंतर सदानंद दाते हे शुक्ला यांच्याकडून पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारतील.

g कडक शिस्तीचे, कर्तव्यदक्ष अधिकारी अशी दाते यांची ओळख आहे. त्यांनी मुंबई पोलीस दलात उपायुक्त, अपर आयुक्त व सह आयुक्त पदावर काम केले आहे. वसई-विरार-मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त, एटीएस प्रमुख तसेच केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असताना आयटीबीपी आणि एनआयएमध्येदेखील दाते यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्यातदेखील त्यांची लढवय्यी वृत्ती दिसून आली होती.