मुंबईत नववर्षाचे जल्लोषी स्वागत; चौपाटीवर तुफान गर्दी, फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळले

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी बुधवारी सायंकाळी लाखो मुंबईकरांनी समुद्रकिनारी हजेरी लावली. 2025 च्या मावळत्या सूर्याला ‘अलविदा’ केल्यानंतर अनेक मुंबईकर चौपाटीवरच थांबले आणि त्यांनी मध्यरात्री 12 वाजता नववर्ष स्वागतासाठी फटाक्यांची तुफान आतषबाजी केली. त्यामुळे मुंबईचे आकाश उजळून निघाले. पुढे रात्रभर जल्लोष, उत्साहाच्या लाटा चौपाटीवर धडकल्या. हाच उत्साह गुरुवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कायम राहणार आहे. नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करणाऱया मुंबईकरांमुळे सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिर परिसर गजबजणार आहे.

सरत्या वर्षात अनेक चांगल्या-वाईट गोष्टी अनुभवायला मिळाल्या तरी मुंबईकर मोठय़ा अपेक्षेने नव्या वर्षाचे स्वागत करतात. यंदाही तोच जोश कायम ठेवून लाखो मुंबईकरांनी बुधवारी सायंकाळी मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, वरळी सी फेस, वांद्रे बॅण्डस्टॅण्ड, जुहू, वर्सोवा, गोराई बीचवर गर्दी केली होती. मोठय़ा प्रमाणावर मुंबईकरांनी कुटुंबीयांसह ‘मुंबई दर्शना’चा बेत आखला होता. सायंकाळी शहरातील प्रेक्षणीय स्थळांचा फेरफटका मारल्यानंतर नागरिक चौपाटीवर विसावले. तेथे कुटुंबीय, मित्रमंडळींसोबत आनंदाचे क्षण साजरे केल्यानंतर त्यांची पावले हॉटेल्स-रेस्तराँकडे वळली. त्यामुळे संपूर्ण रात्रभर शहर आणि उपनगरांत जल्लोषी वातावरण होते. त्यांच्या सोयीसाठी विशेष लोकल, भुयारी मेट्रो, मेट्रो वन आणि बेस्ट बससेवेची व्यवस्था होती. या वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेत दाखल झालेल्या मुंबईकरांमुळे दक्षिण मुंबईचा परिसर गजबजून गेला होता. याचदरम्यान गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त दिला होता. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष खबरदारी बाळगली होती.

नव्या संकल्पांचा देवदर्शनाने श्रीगणेशा

नव्या वर्षात नवीन काहीतरी करण्याचा संकल्प प्रत्येक मुंबईकर करतो. त्या नव्या संकल्पांचा देवदर्शनाने श्रीगणेशाकरण्याकडे मुंबईकरांचा अधिक कल असतो. प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात लाखो भक्त हजेरी लावतात. तसेच दिवसभर महालक्ष्मी, मुंबादेवी आदी मंदिरांमध्येही मोठय़ा प्रमाणावर भक्तांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर मंदिरांच्या ठिकाणी भक्तांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबईत मध्यरात्रीही मद्यपींची वॉइन शॉपबाहेर गर्दी पाहायला मिळत होती.