रामदास आठवलेंचे बंड थंड, भाजपकडून जागा सोडण्याचे आश्वासन

रामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला भाजप आणि शिंदे गटाच्या कोटय़ातून 12 जागा सोडण्याचा निर्णय आज घेण्यात आला. मुंबईतील 227पैकी 12 जागा वाटय़ाला आल्याने आठवलेंच्या पक्षाने ज्या प्रभागात रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार नाही तेथे भाजप-शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीतील जागावाटपात भाजप आणि शिंदे गटाने शेवटच्या क्षणापर्यंत विश्वासात न घेतल्याने संतापलेल्या आठवले यांनी मुंबईत 39 उमेदवारांची घोषणा केली होती. आठवलेंच्या या निर्णयामुळे महायुतीत घटक पक्षांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर आठवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जागावाटपाबाबत चर्चा केली.

रिपब्लिकन पक्षाने फडणवीस यांच्याकडे पक्षाला हव्या असलेल्या 17 जागांची यादी सोपवली. यापैकी पक्षाला  किमान 12  जागा सोडल्या जाणार आहेत. भाजपच्या कोटय़ातून जागा सोडण्याबाबत फडणवीस यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांना निर्देश दिले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून आठवले गटाला सहा जागा सोडल्या जाणार आहेत. अशा 12 जागांवरून भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार माघार घेतील, अशी माहिती आठवले यांनी दिली. रिपब्लिकन पक्षाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी 39 उमेदवारांची घोषणा केली होती. यापैकी 30 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे 12 जागा सोडून उर्वरित 18 ठिकाणी रिपब्लिकन पक्ष मैत्रीपूर्ण लढत करेल, असे आठवले यांनी सांगितले.