
महापालिका निवडणुकीमधील भाजप आणि शिंदे गटातील जागा वाटपातील नाराजी आणि तुटलेल्या महायुतीचे पडसाद आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. कमी जागा वाटय़ाला आल्याने रुसून बसलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटला दांडी मारली. मंत्रिमंडळातील इतर अनेक सदस्यांनीही दांडी मारली. अधिकारी वर्गही अनुपस्थित होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
सरत्या वर्षातील अखेरची राज्य मंत्रिमंडळ बैठक सहय़ाद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित असल्याने चर्चा सुरू झाल्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत कॅबिनेट मंत्र्यांनीही बैठकीकडे पाठ फिरवली.
राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 35च्या आसपास आहे. पण आजच्या जेमतेम 14 ते 15 कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. बैठक सुरू होताच मुख्यमंत्र्यांनी नजर फिरवली तेव्हा शेजारची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची रिकामी होती. इतर मंत्र्यांच्या खुर्च्यांवर नजर फिरवली. त्यानंतर मागील रांगेतील अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांकडे नजर टाकली तेव्हा अधिकाऱ्यांच्या खुर्च्याही रिकाम्या असल्याचे लक्षात आले.
या वर्षातील अखेरची राज्य मंत्रिमंडळाची बैठक असूनही मंत्री आणि अधिकाऱयांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली. तेव्हा विविध विभागाचे सचिव वर्षाअखेरच्या सुट्या संपवण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या पाटर्य़ांसाठी बाहेरगावी गेल्याची माहिती देण्यात आली. मंत्री आणि अधिकाऱयांनी मारलेल्या दांडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि असा प्रकार पुन्हा होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांनी दांडीबहाद्दरांना तंबी दिली.
























































