
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी तब्बल 11 हजार 391 अर्जांची विक्री झाली असताना फक्त 2 हजार 231 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर विविध त्रुटी असल्याने 167 अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, उमेदवारांना 2 जानेवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेपासून वैध उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये काल शेवटच्या दिवशी 2 हजार 516 अर्ज दाखल करण्यात आले होते. डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून सर्व 23 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया राबविण्यात आली. उमेदवारांनी योग्य कागदपत्रे, ना-हरकत प्रमाणपत्रे, अर्जाचे सर्व रकाने नीट भरले आहेत की नाही यासह विविध बाबींची तपासणी करण्यात आली. ज्यांचे अर्ज परिपूर्ण आहेत, त्यांचे अर्ज वैध ठरवून अंतिम करण्यात आले.
























































