
मध्य रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे वेळापत्रक नवीन वर्षात बदलणार आहे. गुरुवारी, 1 जानेवारीपासून वंदे भारत एक्सप्रेससह इंटरसिटी, सिंहगड, डेक्कन क्वीन यांसारख्या अनेक गाडय़ा नव्या वेळेत धावणार आहेत. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱया गाडय़ांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. गाडय़ांचा वेग वाढवण्यासाठी वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.
पश्चिम रेल्वे चर्चगेट-डहाणू मार्गावरील लोकल गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. त्यापाठोपाठ मध्य रेल्वे मुंबई-पुणे मार्गावरील गाडय़ांचे सुधारित वेळापत्रक लागू करणार आहे. परिणामी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱया आणि येणाऱया गाडय़ांच्या वेळेत 5 ते 15 मिनिटांचा फरक पडणार आहे. अनेक गाडय़ांच्या वेळा अलीकडे किंवा पलीकडे केल्या आहेत. मुंबई-पुणे-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या मार्गावर धावणाऱया ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या वेळेत काही मिनिटांचा बदल केला आहे. संबंधित मार्गावर प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. त्याच अनुषंगाने प्रवासी सेवेत सुधारणा आणि गाडय़ांचा वेग वाढवण्यासाठी वेळापत्रकात बदल केला जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.
संकेतस्थळावर नवी वेळ तपासण्याचे आवाहन
मध्य रेल्वेने नव्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांना आवाहन केले आहे. मुंबई-पुणे मार्गावरील अनेक गाडय़ा गुरुवारपासून नवीन वेळेत धावतील. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वी ‘नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम’ या अॅपवर किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर गाडीची सुधारित वेळ तपासावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.



























































