शिंदे गटाच्या इच्छुकाने एबी फॉर्म गिळला, निवडणूक कार्यालयाबाहेर तमाशा

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तेसाठीची हाक किती टोकाला जाऊ शकते, याचा धक्कादायक नमुना पुण्यात पाहायला मिळाला. धनकवडी–सहकार नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 36 (अ) मध्ये शिंदे गटामधील अंतर्गत वाद थेट अशा पातळीकर पोहोचला की, एका इच्छुक उमेदवाराने प्रतिस्पर्ध्याचा अधिकृत एबी फॉर्म  फाडून तो चक्क तोंडात टाकून गिळून टाकला. या प्रकारामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर एकच खळबळ उडाली. राजकीय वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने युतीची बोलणे सुरू ठेवत शिंदे गटाला झुलवत ठेवले. एकीककडे युतीची चर्चा करत असताना दुसरीकडे भाजपने गुपचूप त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटले. शिंदे गटाला उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत युतीचा पत्ता नव्हता. अखेर सर्वच जागावर भाजप अर्ज भरत असल्याचे समजल्यानंतर शिंदे गट सैरभैर झाला. शिंदे गटाला काहीच सुचत नव्हते. त्यांनी मागेल त्याला एबी फॉर्मचे वाटप सुरू केले होते.