
रेल्वे स्थानकात मराठी भाषेतून उद्घोषणा का करत नाही, असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला स्टेशन मास्तरने तब्बल तीन तास आपल्या दालनामध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार भाईंदर स्थानकात उघडकीस आला आहे. जिगर पाटील असे या तरुणाचे नाव आहे. मराठीची गळचेपी का करता, फक्त हिंदी आणि इंग्रजीलाच प्राधान्य का देता, असा सवाल या तरुणाने करताच स्टेशन मास्तर बिपीन सिंग यांनी ‘मराठी नही है तो क्या करे?’ असे मुजोर उत्तर दिले. मराठीचा अपमान करणाऱ्या स्टेशन मास्तरविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भाईंदर रेल्वे स्थानकात ३० डिसेंबर रोजी रात्री ९ ते ११ यावेळेत केवळ हिंदी व इंग्रजी भाषेतून उद्घोषणा करण्यात येत होती. याची माहिती मिळताच भाईंदरमधील मराठी तरुण जिगर पाटील याने स्थानकात जाऊन स्टेशन मास्तर बिपीन सिंग यांची भेट घेतली. तसेच मराठीची गळचेपी का करता, असा रोकडा सवालही केला. त्याने सिंग यांच्याकडे तक्रार वही मागितली. त्यामुळे संतप्त झालेल्या स्टेशन मास्तरने मराठी नही है तो हम क्या करेंगे.. रेल्वे पोलिसांना बोलवा, थांब तुला दाखवतो, अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर त्याला स्वतःच्या दालनामध्ये डांबून ठेवले.
- भाईंदर स्थानकातील स्टेशन मास्तर मराठीचा अपमान करत असल्याचे महेश पवार, प्रवीण भोसले, नाना खुणे आदींनी तातडीने धाव घेतली.
- स्टेशन मास्तरला मराठी हिसका दाखवला. डांबून ठेवलेल्या जिगर पाटील याचीही सुटका केली. महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर करणे सक्तीचे असतानाही मराठीचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा जाब समितीने विचारला.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ‘एक्स’ पोस्टवरून या घटनेची माहिती देत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, मराठीला दुय्यम स्थान देणाऱ्या स्टेशन मास्तरवर गुन्हा दाखल करून कारवाई करा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
260 रुपयांचा दंड ठोठावला
मराठीमध्ये उद्घोषणा का केली नाही, असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या जिगर पाटील याला स्टेशन मास्तरने केवळ डांबूनच ठेवले नाही तर तुम्ही विना तिकीट स्थानकात प्रवेश केला असे सांगत तिकीट तपासनीसाला बोलावून 260 रुपयांचा दंड ठोठावला आहे. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणे गुन्हा आहे काय, असे विचारत जिगर पाटील याने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.




























































