
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता प्रीपेड टॅक्सी आणि रिक्षा स्टॅण्ड सुरू होणार आहे. या स्टॅण्डचे पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाकडून सर्वेक्षण पूर्ण झाले असून राज्याच्या परिवहन आयुक्तांनी या प्रीपेड टॅक्सी थांब्यांची स्थळपाहणी नुकतीच केली. यानंतर पनवेल प्रादेशिक विभागाच्या कार्यालयाने विमानतळ परिसरातील परिवहनचे व्यवस्थापन पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रीपेड स्टॅण्डची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
नवी मुंबई विमानतळावरून पहिल्या पाच दिवसांत तब्बल २६ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. येत्या पंधरवड्यात ही संख्या लाखांवर पोहोचणार आहे. पहिल्या टप्प्यात देशांतर्गत उड्डाणे सुरू असून मार्च अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या अनेक पटीने वाढणार असल्याने प्रवाशांना विमान प्रवासानंतर माफक दरात निश्चित स्थळी जाण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने कंबर कसली आहे.
रिक्षा स्टॅण्ड हे विमानतळापासून काही अंतरावर असल्यामुळे रिक्षा स्टॅण्ड ते विमानतळ अशा मोफत बससेवेचा लाभ प्रवाशांना नवी मुंबई विमानतळावर मिळू शकणार आहे. मात्र रिक्षा थांब्यावरील प्रवाशांची संख्या मोठी असल्यावर बसचा प्रयोग यशस्वी होणार आहे.
दरफलक उभारण्याच्या सूचना
मुंबई विमानतळाप्रमाणे येथे प्रीपेड टॅक्सी व रिक्षा थांब्यासाठी जागा निश्चित करून प्रीपेड टॅक्सी सेवा सुरू केली त्याच धतींवर नवी मुंबई विमानतळाच्या टॅक्सी थांब्यातून ही सेवा सुरू करण्याचे नियोजन आखले जात आहे. राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी पाहणीनंतर पनवेलच्या प्रादेशिक परिवहन विभागाला तातडीने थांबे उभारून त्यामधून प्रवाशांना सोय सुरू करा, दरफलक उभारा अशा विविध सूचना केल्या आहेत.




























































