अजित पवार गटाची शरद पवार गटावर कुरघोडी, 18 जागा ठरलेल्या असताना 4 जागांवर बोळवण

विधानसभा निवडणुकीला हट्ट करून पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महापालिका निवडणुकीत उमेदवार देताना पुरती नाचक्की झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाल्याचा मोठा गाजावाजा केला असतानाच, शरद पवार गटाला फक्त एकाच प्रभागातील चार जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अजित पवार गटाने शरद पवार गटाला गुंडाळल्याची भावना कार्यकत्यांमध्ये झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील भाजपची सत्ता खेचून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावू, असे पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यासाठी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी अजित पवार गटाने आघाडी केली आहे. आघाडीमध्ये अजित पवार गट ११०, शरद पवार गट १८, तर प्रभाग क्रमांक ९ आणि २० मध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून उमेदवारांच्या होत असलेल्या पळवापळवीमुळे एकाही राजकीय पक्षाने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत उमेदवारांची अधिकृत यादीच प्रसिद्ध केली नाही. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने १२३ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. या यादीमध्ये शरद पवार गटाला शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख कस्पटेवस्ती येथील चार जागा दिल्या आहेत. वास्तविक १८ जागा शरद पवार गटाला देण्याचे जाहीर करून अवघ्या चार जागा दिल्यामुळे पुतण्याने काकाच्या पक्षाला पिंपरी-चिंचवड शहरात गुंडाळल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये झाली आहे.

वेळेत उमेदवारच मिळाले नाहीत…

शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोजकी ताकद आहे. विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाल्यामुळे एक मोठा गट पालिका निवडणुकीपूर्वीच अजित पवार गटाबरोबर गेला होता. त्यामुळे शरद पवार गटात दोन माजी नगरसेवकांसह तीन ते चार प्रभागांतच पक्षातील पदाधिकारी सक्रीय होते. शरद पवार गटाला आघाडीत मिळालेल्या १८ जागांवरही शहराध्यक्ष तुषार कामठे यांना उमेदवार देता आले नसल्याचे दिसून येत आहे.

प्रभाग क्रमांक १३ मध्ये तीनच उमेदवार

महापालिकेत सत्ता काबीज करण्याची भाषा करणारे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पक्षाला ३२ प्रभागांत उमेदवार देतानाही नाकीनऊ आल्याचे दिसून येत आहे. शरद पवार गटाला चार जागा दिल्यानंतर १२८ पैकी १२४ जागांवर अजित पवार गट उमेदवार देणे अपेक्षित होते. मात्र, प्रभाग क्रमांक १३ निगडी गावठाण-यमुनानगरमध्ये फक्त तीनच उमेदवार देता आले. सर्वसाधारण महिला या जागेवर अजित पवार गटाला उमेदवारच मिळाला नाही.