पुतीन यांच्या घरावर युक्रेनने केला ड्रोनने हल्ला, रशियाने जारी केला व्हिडीओ

युक्रेनने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोनहल्ला केला आहे. रशियाने बुधवारी एका पाडलेल्या ड्रोनचा व्हिडिओ जारी केला आहे. नोव्हगोरोड (Novgorod) प्रांतातील राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यासाठी युक्रेनने या ड्रोनचा वापर केला होता. मात्र, युक्रेनने रशियाचा हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

रशियन संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये एक निकामी झालेला ड्रोन दिसत आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, हा हल्ला अत्यंत नियोजित होता. रात्रीच्या वेळी चित्रीकरण केलेल्या या व्हिडिओमध्ये, बर्फाच्छादित जंगलात पडलेल्या ड्रोनच्या अवशेषांजवळ एक रशियन सुरक्षा रक्षक उभा असल्याचे दिसत आहे. रशियाच्या दाव्यानुसार हा युक्रेनचा ‘चाकलुन-व्ही’ (Chaklun-V) नावाचा ड्रोन होता. या ड्रोनमध्ये 6 किलो वजनाची स्फोटके होती, ज्यांचा स्फोट झाला नाही.

दुसरीकडे युक्रेनने रशियाचे हे आरोप म्हणजे फेटाळून लावले आहेत. शांतता चर्चा भरकटवण्यासाठी मॉस्को असे प्रयत्न करत असल्याचा आरोप कीवने केला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा सुरू असतानाच पुतीन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ल्याचा हा दावा समोर आला आहे.

रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी यापूर्वी माहिती दिली होती की, 28 डिसेंबरच्या रात्री युक्रेनने पुतीन यांच्या निवासस्थानावर 91 ड्रोन वापरून हल्ला केला होता. लावरोव यांनी सांगितले की सर्व ड्रोन यशस्वीरित्या पाडण्यात आले आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. रशियाने याला दहशतवादी कृत्य म्हटले असून प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी लावरोव यांचे दावे फेटाळून लावले आहेत. झेलेन्स्की म्हणाले की, हे दावे म्हणजे केवळ एक रचलेल्या कथा आहेत. शांततेसाठी सुरू असलेले प्रयत्न कमकुवत करण्यासाठी रशियन महासंघाने रचलेला हा आणखी एक खोटा डाव आहे, असेही त्यांनी नमूद केले.