
हिंदुस्थानी वंशाचे डेमोक्रॅट नेते जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क सिटीच्या महापौरपदाची शपथ घेतली. मॅनहॅटन येथील ऐतिहासिक सिटी हॉल सबवे स्टेशन मध्ये आयोजित शपथविधीत ममदानी यांनी कुराणावर हात ठेवून शपथ घेतली. अमेरिकेतील सर्वात मोठ्या शहराचे पहिले मुस्लिम महापौर ठरले आहेत. शपथविधीत ममदानी यांना न्यूयॉर्कच्या अॅटर्नी जनरल आणि राजकीय सहकारी लेटिशिया जेम्स यांनी शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर ममदानी म्हणाले, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आणि सौभाग्याचा क्षण आहे.”
जुन्या सिटी हॉल सबवे स्टेशनमध्ये पार पडलेल्या या शपथविधीला ऐतिहासिक महत्त्व आहे. ममदानी यांचा दुसरा शपथविधी समारंभ सिटी हॉलमध्ये होणार आहे, जिथे त्यांना अमेरिकेचे सिनेटर बर्नी सॅंडर्स शपथ देतील. या सोहळ्यानंतर ब्रॉडवे येथील ‘कॅनियन ऑफ हीरोज’ परिसरात सार्वजनिक ब्लॉक पार्टीचे आयोजन केले जाणार आहे, जे ऐतिहासिक टिकर-टेप परेडसाठी प्रसिद्ध आहे.
शपथविधीच्या माध्यमातून ममदानी यांनी अमेरिकेतील सर्वात आव्हानात्मक आणि दबावाखाली असलेल्या पदांपैकी एकाची जबाबदारी स्वीकारली आहे. न्यूयॉर्क सिटीचे महापौर म्हणून ते आता देशातील सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या नेत्यांमध्ये गणले जाणार आहेत.


























































