
समाजात वावरताना केवळ आध्यात्मिक चर्चा करून चालणार नाही, तर आचरणात समरसता आणणे काळाची गरज आहे. जात, प्रांत, भाषा आणि संपत्तीच्या आधारावर माणसाचे मूल्यांकन करणे थांबवा. मंदिर, मठ, तलाव, विहिरी आणि अगदी स्मशानभूमी देखील कोणत्याही एका जातीची मक्तेदारी नसून ती सर्व हिंदू बांधवांसाठी खुली असलीच पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेदभावाच्या मानसिकतेवर परखड शब्दात भाष्य केले. ते छत्तीसगडमधील सोनपैरी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू समाजातील अंतर्गत भेदांवर बोट ठेवत सामाजिक सलोख्याचा मंत्र दिला.
सामाजिक सलोख्याच्या दिशेने पडणारे पहिले पाऊल म्हणजे आपल्या मनातील विभाजनाची मानसिकता गाडून टाकणे. आपण ज्या वस्तीत राहतो, तिथे राहणारे सर्व हिंदू आपले मित्र असायला हवेत. जात, संप्रदाय किंवा भाषा यावरून निर्माण होणारे अंतर मिटवून मैत्रीचे नाते घट्ट करा. हा देश सर्वांचा आहे आणि हीच भावना खऱ्या अर्थाने सामाजिक सलोखा निर्माण करेल, असे मोहन भागवत यावेळी म्हणाले.
केवळ भाषणाने समाज बदलत नाही, तर ती कृती आपल्या दैनंदिन जीवनात उतरायला हवी, असे सांगत भागवत यांनी पाच महत्त्वाच्या बाबींवर भर दिला. पहिले म्हणजे सामाजिक समरसता- जातपात विसरून एकत्र येणे, दुसरे म्हणजे कुटुंब प्रबोधन: घरातील संवाद वाढवून कुटुंबव्यवस्था मजबूत करणे, तिसरे म्हणजे स्वदेशीचा आग्रह – आपल्या देशातील उत्पादनांना प्राधान्य देणे, चौथे म्हणजे शिस्तबद्ध जीवन – एक जबाबदार नागरिक म्हणून जगणे आणि पाचवे म्हणजे पर्यावरण रक्षण – निसर्गाचा समतोल राखणे.
मंदिर आणि स्मशानभूमीच्या प्रवेशावरून होणाऱ्या वादांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, समाजातील प्रभावशाली व्यक्तींनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. आपल्या परिसरातील धार्मिक स्थळे आणि जलस्रोत सर्वांसाठी खुले आहेत याची खात्री करावी. या मुद्द्यांवरून कोणताही संघर्ष किंवा हिंसाचार होता कामा नये. सामाजिक कार्य म्हणजे समाजात फूट पाडणे नसून सर्वांना एकत्र जोडणे होय.
























































