
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थलांतरित आणि परदेशी नागरिकांच्या प्रवेशाबाबत घेतलेल्या कठोर निर्णयांचे पडसाद आता जागतिक स्तरावर उमटू लागले आहेत. ट्रम्प प्रशासनाने जगातील 39 देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत येण्यास पूर्ण किंवा आंशिक बंदी घातली आहे. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून आता आफ्रिकन देश सरसावले असून बुर्किना फासो आणि माली या दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.
बुर्किना फासो आणि माली या दोन्ही देशांनी स्पष्ट केले आहे की, ट्रम्प प्रशासनाने त्यांच्या नागरिकांवर जे निर्बंध लादले आहेत, तेच नियम आता अमेरिकन नागरिकांनाही लागू होतील. बुर्किना फासोचे परराष्ट्र मंत्री करामाो जीन मॅरी त्राओरे यांनी म्हटले की, आम्ही अमेरिकन नागरिकांसाठी तेच प्रवेश नियम लागू करू जे अमेरिकेने आमच्या लोकांसाठी केले आहेत. हे पाऊल समानतेच्या तत्त्वावर आधारित आहे.
दुसरीकडे मालीच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकन प्रशासनाने मालीच्या नागरिकांसाठी ज्या अटी ठेवल्या आहेत, त्याच अटींनुसार आता अमेरिकन नागरिकांना मालीमध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच, इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी अमेरिकेने कोणतीही चर्चा न केल्याबद्दल मालीने खेद व्यक्त केला आहे.
39 देशांवर निर्बंधांची टांगती तलवार
ट्रम्प प्रशासनाने सुरक्षेचे कारण देत 39 देशांच्या नागरिकांवर प्रवासाचे निर्बंध लादले आहेत. यामध्ये प्रामुख्याने 25 आफ्रिकन देशांचा समावेश आहे. सीरिया, पॅलेस्टाईन, नायजर, सिएरा लिओन, दक्षिण सुदान यांसारख्या देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही. तर सेनेगल आणि आयव्हरी कोस्ट यांसारख्या देशांवर काही अटींसह निर्बंध घालण्यात आले आहेत.
फिफा वर्ल्ड कपवर परिणाम?
2026 मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये फिफा वर्ल्ड कप आयोजित केला जाणार आहे. ट्रम्प यांनी ज्या देशांवर बंदी घातली आहे, त्यापैकी काही देश या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. याबाबत ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, खेळाडूंना प्रवेश दिला जाईल, मात्र या देशांतील फुटबॉल चाहत्यांच्या प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. यामुळे फुटबॉल प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
























































