
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा फटका बसला असून 1 जानेवारी 2026 पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर वाढविण्यात आले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या कॉमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर 111 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशभरात हे नवे दर लागू झाले आहेत. मात्र, 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नव्या दरांनुसार दिल्लीमध्ये आतापर्यंत 1580.50 रुपयांना मिळणारा 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर आता 1691.50 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात त्याची किंमत 1684 रुपयांवरून 1795 रुपये इतकी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये 1531.50 रुपयांचा सिलेंडर आता 1642.50 रुपये झाला असून चेन्नईमध्ये 1739.50 रुपयांऐवजी 1849.50 रुपये इतकी नवीन किंमत आकारली जाणार आहे.
यापूर्वी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. 1 डिसेंबर 2025 पासून दरकपात लागू झाली होती. त्यावेळी दिल्ली आणि कोलकात्यात 10 रुपये, तर मुंबई आणि चेन्नई येथे 11 रुपयांची घट झाली होती. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेलाही व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. दिल्लीमध्ये 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1595.50 रुपयांवरून 1590 रुपये, कोलकात्यात 1700.50 वरून 1694 रुपये, मुंबईत 1547 वरून 1542 रुपये आणि चेन्नईत 1754.50 वरून 1750 रुपये करण्यात आली होती.
मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत अजूनही कोणताही बदल झालेला नाही. 14 किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत एप्रिलपासून स्थिर असून सध्या दिल्लीमध्ये 853 रुपये, कोलकात्यात 879 रुपये, मुंबईत 852 रुपये आणि चेन्नईत 868 रुपये एवढी किंमत आहे.

























































