
कुलाबा येथील तीन वॉर्डांमध्ये आपल्या कुटुंबातील तीन उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दबाव आणल्याचा आरोप ओबीसी नेते व माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे. अध्यक्षांच्या दबावामुळे विरोधी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले नाहीत. या विरोधात हरीभाऊ राठोड यांनी पालिका आयुक्त व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. आम्हाला धमकावले गेले. अर्ज भरण्यापासून रोखले, अधिकाऱ्यांवर दबाव टाकला गेला, असा आरोप या उमेदवारांनीही जाहीरपणे माध्यमांपुढे केला होता. दरम्यान, राठोड यांच्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने पालिका आयुक्तांना यासंदर्भातील अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी 30 डिसेंबर हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 या तीन प्रभागांतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करतेवेळी राहुल नार्वेकर हेही उपस्थित होते. यावेळी या तीन प्रभागातील अन्य उमेदवारांना अर्ज भरण्यापासून त्यांनी रोखल्याचा तसेच सभागृहात धमकावल्याचा आरोप इतर पक्षांच्या उमेदवारांनी केला आहे. तसेच अधिकाऱ्यांवर दबाव टाकून इतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास मनाई करण्यात आल्याचा आरोपही विरोधी उमेदवारांनी केला आहे. यासंदर्भात काही पक्षाच्या उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. इतर उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवून नार्वेकर यांना त्यांच्या नातेवाईकांना बिनविरोध निवडून आणायचे असा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोप माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी तक्रारीत केला आहे.
भायखळा येथील रिचर्डसन क्रूडासमधील निवडणूक कार्यालयात हा सर्व प्रकार घडला. राज्य निवडणूक आयोगाने या तक्रारींची दखल घेऊन मुंबई महापालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश देऊन त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. सभागृहात अर्ज दाखल करतानाचा उमेदवारांचा व्हिडिओ, उमेदवारांसोबत कोण कोण उपस्थित होते, राहुल नार्वेकर कशासाठी आले होते, नार्वेकर यांनी खरोखरच उमेदवारांना धमकावले काय? तसे असेल तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने कोणती खबरदारी घेतली, कारवाई का केली नाही, आदी मुद्दे विचारात घेतले जाऊन त्यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. वास्तविक उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवारासोबत केवळ अर्जावर सूचक-अनुमोदक असलेली व्यक्ती, पोलिंग एजंट हेच जाऊ शकतात. त्यामुळे राहुल नार्वेकर कक्षात कशासाठी गेले होते, याचीही चौकशी केली जाणार आहे.
आरोप काय?
कुलाबा प्रभाग क्रमांक 225, 226 227 मध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी फॉर्म भरले. टोकन घेतले, पडताळणी झाली. अनामत रक्कम भरली. त्यानंतर अचानक काय झाले याची कल्पना नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आत-बाहेर सुरू होते. त्यांच्या मतदारसंघातील विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद करून बिनविरोध निवडून आणायचा त्यांचा प्रयत्न होता. आमच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले नाहीत. आम्ही पालिका आयुक्तांना नियम दाखवला. 30 डिसेंबरला पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यालयात पोहोचायला पाहिजे. आम्ही वेळेपूर्वीच कार्यालयातच पोहोचलो होतो. पण पोलिसांच्या मदतीने उमेदवारांना अक्षरशः बाहेर काढण्यात आले. हा अन्याय आहे, असे माजी खासदार हरिभाऊ राठोड म्हणाले.
संविधानिक पदावरील व्यक्ती जर अशा पद्धतीने जर निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत असेल तर ती गंभीर बाब आहे. – हरिभाऊ राठोड, माजी खासदार





























































