
हिंदुस्थानसाठी क्रिकेटसाठी 2026 हे वर्ष सर्वार्थाने कसोटीचे ठरणार आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कप राखण्याचे दडपण, कसोटी क्रिकेटमध्ये झालेली घसरण सावरण्याचे आव्हान आणि सलग देशांतर्गत-परदेशी दौऱयांचा ताण या सर्व कार्यक्रमांचा समतोल राखणे, हे हिंदुस्थानी क्रिकेट संघ व्यवस्थापनासमोर खडतर आव्हान असेल. त्यामुळे टीम इंडिया आणि संघ व्यवस्थापन यांना वर्षभरात वारंवार परीक्षेला सामोरे जावे लागेल.
हिंदुस्थानचा संघ टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वरच्या स्थानी असल्यामुळे पुढच्या महिन्यात मायभूमीत होणाऱया टी-20 वर्ल्ड कपचे जेतेपद राखण्याचे जबर आव्हान आहेच. मात्र कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या दारुण कसोटी पराभवामुळे हिंदुस्थानची झालेली घसरण खूप मोठय़ा चिंतेचा विषय आहे. संघाला पुन्हा शर्यतीत आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. एक विशेष बाब म्हणजे वन डेत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून संघ टॉपवर आहे. ते स्थान कायम राखण्यासाठीही झगडावे लागणार आहे. त्याचबरोबर हिंदुस्थानी संघ न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि विंडीजविरुद्ध मायदेशी कसोटीसह वन डे, टी-20 सामनेही खेळणार आहे. इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या दौऱयावरही जाणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरारही याच वर्षी रंगणार आहे.
पुरुष संघाप्रमाणे हिंदुस्थानच्या महिला क्रिकेटसाठीही हे वर्ष धकाधकीचेच राहणार आहे. महिला प्रीमियर लीग 9 जानेवारीपासून सुरू होणार असून यात हिंदुस्थानच्या सर्वच्या सर्व महिला स्टार खेळणार आहेत. तसेच जूनमध्ये इंग्लंड-वेल्समध्ये महिला टी-20 वर्ल्ड कप रंगणार आहे. यातही वन डे जगज्जेत्या महिला संघाला टी-20 तही त्याची पुनरावृत्ती करण्याची नामी संधी असेल. यात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कठीण लढती अपेक्षित आहेत. एवढेच नव्हे तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या भरगच्च दौऱयातही कसोटी लागेल.
ज्युनियर्सच्या वर्ल्ड कपने प्रारंभ
हिंदुस्थानचा 19 वर्षांखालील युवा संघ झिम्बाब्वे आणि नामिबियात होणाऱया वन डे वर्ल्ड कपमध्ये आपली ताकद आजमावणार आहे. येत्या 15 जानेवारीपासून या वर्ल्ड कपचा संग्राम सुरू होईल. या स्पर्धेत 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या झंझावातावर अवघ्या जगाचे लक्ष लागणार आहे.
हिंदुस्थानच्या पुरुष संघाचा कार्यक्रम
- जुलै ते डिसेंबर 2026 ः परदेशी दौऱ्यांची मॅरेथॉन
- जुलैः इंग्लंड दौरा (5 टी-20, 3 वन डे)
- ऑगस्टः श्रीलंका दौरा (2 कसोटी)
- सप्टेंबरः अफगाणिस्तान टी-20 मालिका, आशियाई क्रीडा स्पर्धा
- ऑक्टोबर-नोव्हेंबरः न्यूझीलंड दौरा (2 कसोटी)
- डिसेंबरः श्रीलंकेचा हिंदुस्थान दौरा (वन डे- टी-20)



























































