
शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आज देशभरातून लाखोंचा जनसागर लोटला. या सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.
1818च्या कोरेगाव भीमा लढय़ामध्ये शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ पेरणे येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दरवर्षी येतात. यंदा महाराष्ट्रासह देशभरातील विविध भागांतून आलेल्या लाखो अनुयायांनी अभिवादन करून विजयस्तंभाला सलामी दिली. सकाळी सहा वाजता उपमुख्यमंत्री आणि जिह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
माजी सैनिकांची मानवंदना
महार रेजिमेंटमधून निवृत्त झालेल्या ‘यशसिद्धी आजी-माजी सैनिक संघटने’च्या माध्यमातून सुमारे 3000 निवृत्त महार सैनिकांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता विजयस्तंभाला मानवंदना दिली.































































