अपघातमुक्त प्रवासासाठी एसटी चालकांचे प्रबोधन; नियमित प्रशिक्षण, वैद्यकीय तपासण्या करणार, मुंबई सेंट्रल येथे सुरक्षितता अभियानाचा शुभारंभ

एसटीच्या अपघातमुक्त प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यभर सुरक्षितता अभियान सुरू केले आहे. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयापासून प्रत्येक आगार पातळीवर एकाचवेळी हे अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत अपघात टाळण्यासाठी एसटी चालकांचे प्रबोधन करण्याबरोबर नियमित प्रशिक्षण आणि वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार आहेत.

एसटीचे मध्यवर्ती कार्यालय आणि मुंबई विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षितता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई सेंट्रल येथे पार पडलेल्या समारंभप्रसंगी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी गिरीश देशमुख, नितीन मैद, दिनेश महाजन, मोहनदास भरसट, प्रमोद जगताप, गिरीश गुरव, तुषार चव्हाण उपस्थित होते. ‘प्रवाशांचा प्रवास सुरक्षित ठेवणे हे आमचे कर्तव्य’ असा निर्धार महामंडळाने केला आहे. त्याचदृष्टीने चालक-वाहकांना नियमित प्रशिक्षण व त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार आहेत. परळ आगारात राज्याच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे निवृत्त उपसचिव शांताराम कुदळे यांच्या हस्ते ‘सुरक्षितता मोहीम’ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी एसटी मुंबई विभागीय भांडार अधिकारी  निखिल शिंदे, शेखर साबळे, मनोहर पाटील, आगार व्यवस्थापक नितीन चव्हाण आदी उपस्थित होते.