
लाखो रोजगार निर्माण करणाऱया लॉजिस्टिक क्षेत्रासाठी स्वतंत्र कौशल्य विकास योजनेची गरज असल्याच्या पार्श्वभूमीवर आज अखिल महाराष्ट्र लॉजिस्टिक्स संघटनेच्या शिष्टमंडळाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली.
लॉजिस्टिक क्षेत्रात वेगाने होणाऱया घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. यासाठी महाराष्ट्रात लॉजिस्टिक क्षेत्रासाठी स्वतंत्र कौशल्य विकास योजना शिवसेनेच्या माध्यमातून सुरू व्हावी आणि ही योजना राज्य शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राज्य सरकारने लॉजिस्टिक क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्यासह अखिल महाराष्ट्र लॉजिस्टिक्स संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.































































