
संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे (वसुधैव कुटुंबकम) अशी घोषणा देणाऱया आपल्या समाजात, रक्ताच्या नात्यांमध्ये होणारे टोकाचे वाद हे सामाजिक विषमतेचे दर्शन घडवतात, अशी खंत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली. एका मालमत्ता वादावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवतानाच मालमत्तेसाठी सख्खी भावंडे एकमेकांचे वैरी बनत असल्याकडेही लक्ष वेधले.
एका मालमत्तेच्या वाटणीवरून कुटुंबातील सदस्यांमध्ये दीर्घ काळापासून कायदेशीर लढाई सुरू होती. या प्रकरणातील वाद इतका विकोपाला गेला होता की, नातेवाईकांनी एकमेकांविरुद्ध अनेक गंभीर आरोप केले होते. या प्रकरणातील गुंतागुंत आणि कौटुंबिक कडवटपणा पाहून न्यायालयाने सामाजिक मानसिकतेवर भाष्य केले. न्यायमूर्ती महेश सोनक व न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने म्हटले की, आपण जागतिक स्तरावर एकतेच्या गप्पा मारतो, पण घराघरात मात्र मालमत्ता आणि पैशांवरून भाऊ-बहिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळतात. कौटुंबिक वादांमुळे न्यायालयांमध्ये खटल्यांची संख्या वाढत असून ज्या गोष्टी चर्चेने सुटू शकतात, त्यांसाठी वर्षानुवर्षे वेळ आणि पैसा वाया घालवला जात आहे. ही चिंतेची बाब असल्याचे न्यायालयाने म्हटले.
पुढच्या पिढीवर वाईट संस्कार
कौटुंबिक वादांमुळे केवळ मालमत्तेचे नुकसान होत नाही, तर पुढच्या पिढीवरही याचे वाईट संस्कार होतात. जर आपण जगाला कुटुंब मानण्याचा दावा करत असू, तर किमान स्वतःच्या घरात तरी शांतता आणि एकोपा राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे न्यायालयाने नमूद केले.































































