
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हार्बरच्या प्रवाशांना गारेगार प्रवासाचे गिफ्ट मिळणार आहे. मध्य रेल्वे प्रशासन लवकरच हार्बर मार्गावर पहिली वातानुकूलित लोकल चालवण्याच्या तयारीत आहे. याचा प्रस्ताव ऑपरेशन विभागाने मध्य रेल्वे मुख्यालयाकडे पाठवला असून त्याला अंतिम मंजुरी मिळताच हार्बर मार्गावर एसी ट्रेन चालवली जाण्याची शक्यता आहे.
अलीकडेच चेन्नई येथून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दाखल झालेली नवीन एसी ट्रेन हार्बर मार्गावर चालवली जाण्याची दाट शक्यता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. नवीन एसी लोकल मेन लाईन किंवा हार्बर मार्गावरील सेवेत रुजू केल्यानंतर किती फेऱयांची वाढ होऊ शकते? दोन मार्गांवर एसी लोकलची कुठे किती किती गरज आहे? आदींचा तपशील ऑपरेशन विभागाने मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठवला आहे. प्रस्तावात प्रामुख्याने हार्बरचा पर्याय देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नवी एसी लोकल तूर्त मेन लाईनवर सेवेत
नवीन एसी लोकलच्या समावेशामुळे मध्य रेल्वेच्या ताफ्यातील एसी लोकलची संख्या आठ झाली आहे. नव्या एसी लोकलची मेन लाईनवर दोन-तीनदा चाचणी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी आधीच्या एसी लोकलमधील एका ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्या ट्रेनच्या जागी नवी एसी लोकल चालवली जात आहे.




























































