
देशाला लवकरच बहुप्रतीक्षित पहिली ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्लीपर ट्रेनचा मार्ग जाहीर केला. ही पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी आणि कोलकातादरम्यान धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. येत्या 17 किंवा 18 जानेवारी रोजी वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशी सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन देशातील पहिल्या ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनची माहिती दिली. ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये प्रवास करणाऱया प्रवाशांना आरामदायी बेड उपलब्ध असणार आहेत. सध्या प्रवाशी सेवेत धावत असलेल्या ‘वंदे भारत’ ट्रेनमध्ये खुर्चीची व्यवस्था आहे. त्यामुळे प्रवाशांना फक्त बसून प्रवास करता येत आहे. नव्या स्लीपर ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. ही स्लीपर ट्रेन गुवाहाटी-कोलकाता यादरम्यान धावेल. ट्रेनमध्ये 3 एसीचे भाडे 2,300 असेल. त्यात जेवणाचा समावेश आहे. तसेच 2 एसीमध्ये प्रवास करणाऱया प्रवाशांना 3 हजार रुपये, तर 1 एसीच्या प्रवासासाठी 3,600 रुपये मोजावे लागणार आहेत.
स्वदेशी तंत्रज्ञान अन् अत्याधुनिक सुविधा
रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेल्या ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनची अंतिम हायस्पीड चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. ट्रेनचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर आहे. चाचणीदरम्यान ट्रेनची राइड गुणवत्ता, ब्रेकिंग सिस्टम, आपत्कालीन ब्रेक आणि सुरक्षा प्रणालींची चाचणी घेण्यात आली. ट्रेनमध्ये आधुनिक स्वच्छतागृहे आहेत.































































