
नवीन वर्षाचे स्वागत जगभरात उत्साहात होत असताना, जर्मनीमध्ये राहणाऱ्या एका हिंदुस्थानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तेलंगणा राज्यातील जनगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय हृतिक रेड्डी याचा जर्मनीमध्ये भीषण आगीतून वाचण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. हृतिक मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून हिंदुस्थानात आपल्या घरी परतणार होता, मात्र त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी उशिरा रात्री जर्मनीतील हृतिकच्या निवासस्थानाला भीषण आग लागली. आगीचा भडका आणि धुराचे लोट इतके तीव्र होते की हृतिकने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खाली उडी मारली. या प्रयत्नात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सणापूर्वीच कुटुंबावर शोककळा हृतिक रेड्डी जून २०२३ मध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ युरोप’मधून एमएस (MS) करण्यासाठी जर्मनीला गेला होता. त्याने २०२२ मध्ये वागदेवी अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली होती. दसऱ्याच्या सुट्टीत घरी न येता, त्याने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात संक्रांतीला घरी येण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्याच्या आगमनाऐवजी आता त्याचे पार्थिव मायदेशी येणार असल्याने मलकापूर गावावर शोककळा पसरली आहे.
मदत आणि पुढील कार्यवाही
हृतिकचे पार्थिव लवकरात लवकर हिंदुस्थानात आणण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालय आणि जर्मनीतील हिंदुस्थानी दूतावासाकडे मदतीची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासन सध्या आगीच्या कारणाचा तपास करत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, गेल्या काही दिवसांत परदेशातील तेलंगणाच्या विद्यार्थ्यांसोबत घडलेली ही दुसरी दुःखद घटना आहे. गेल्याच महिन्यात न्यूयॉर्कमध्ये लागलेल्या आगीत जनगाव जिल्ह्यातीलच सहज रेड्डी उदुमाला या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.




























































