
केरळमध्ये संघाच्या मुखपत्रात मुस्लीम लीगचे लेख छापून आल्याने एकच गोंधळ उडाला होता. पण ही तांत्रिक चूक असल्याची सारवासारव संघाला करावी लागली.
केरळात नववर्षाच्या दिवशी घडलेल्या एका अनोख्या गोंधळाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जन्मभूमी’ या दैनिकाच्या कण्णूर–कासरगोड आवृत्तीमध्ये १ जानेवारीला मुस्लिम लीगच्या ‘चांद्रिका’ या वृत्तपत्राचे संपादकीय पान छापले गेले. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे राज्याध्यक्ष सय्यद सादिक अली शिहाब थंगल यांना पक्षकार्यकर्त्याने फोन करून त्यांचा लेख ‘जन्मभूमी’मध्ये प्रसिद्ध झाल्याची माहिती दिली तेव्हा ही बाब समोर आली. सुरुवातीला हा एखादा विनोद असावा असे मानणाऱ्या थंगल यांनी नंतर प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर लेख छापला गेल्याची पुष्टी केली. थंगल यांच्या लेखासोबतच इंडियन युनियन मुस्लीम लीगचे नेते एम. के. मुनीर यांचा लेख आणि ‘ए लेफ्ट फ्रंट इन क्रम्बल्स’ या मथळ्याचा लेखही ‘जन्मभूमी’च्या संपादकीय पानावर छापला गेला. इतर सर्व पाने मात्र जन्मभूमीचीच होती.
दोन्ही वृत्तपत्रांचे छपाई एकाच प्रेसमध्ये होत असल्याने तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिक माध्यमांनी नमूद केले. गोंधळ केवळ कण्णूर आणि कासरगोड आवृत्त्यांपुरताच मर्यादित राहिला. दोन विरोधी विचाराच्या पक्षांच्या मुखपत्रांमध्ये असा “संपादकीय अदलाबदल” झाल्याने सोशल मीडियावर या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली.
सीपीएमचे ज्येष्ठ नेते एम. व्ही. जयराजन यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया देताना दोन वर्तमानपत्रे मिळून एकच वृत्तपत्र बाहेर पडल्याचा टोला लगावला आणि या घटनेतून मुस्लिम लीग आणि भाजप यांच्यातील कथित जवळीक उघड झाली असा आरोप केला. दोन पक्षातील नेते आणि कार्यकर्ते सत्तेसाठी एकत्र येत असल्यानेच असा “चांद्रभू्मी” जन्माला आला, असे ते म्हणाले.
दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचे सचिव पी. एम. मनोज यांनी फेसबुक पोस्टद्वारे या प्रकाराची खिल्ली उडवली. एकाच प्रेसमध्ये छापाई होत असताना अशा चुका होऊ शकतात, असे म्हणत त्यांनी ‘जन्मभूमी’मध्ये छापलेल्या ‘चांद्रिका’च्या संपादकीय पानात भाजपसंबंधी एकही ओळ नसल्याचे नमूद करून व्यंगात्मक भाष्य केले. त्यामुळे ‘चांद्रिका’चे संपादकीय धोरण भाजप पूर्णपणे स्वीकारू शकेल, असा उपरोधिक उल्लेख त्यांनी केला.
याउलट मुस्लिम लीग समर्थक पृष्ठांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, संबंधित पानावरील मुख्य लेख ‘वंदे मातरम आणि संघ परिवार’ या मालिकेचा भाग असल्याचे स्पष्ट केले आणि छपाईतील तांत्रिक त्रुटी मान्य करूनही निवडक टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. दोन्ही वृत्तपत्रांकडून या प्रकरणावर अद्याप अधिकृत स्पष्टीकरण जारी करण्यात आलेले नाही.




























































