गिलचे पुनरागमन पंड्या-बुमराला विश्रांतीची शक्यता

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱया तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा 3 किंवा 4 जानेवारीला होण्याची दाट शक्यता आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे अनुभवी खेळाडू संघात दिसणार असून, वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करता हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरा यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

दक्षिण आफ्रिका दौऱयात दुखापतीमुळे एकदिवसीय सामने खेळू न शकलेला कर्णधार शुभमन गिल न्यूझीलंड मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. कसोटी मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती, मात्र त्यानंतर टी-20 मालिकेत यशस्वी पुनरागमन करत त्याने आपली तयारी सिद्ध केली आहे. त्यामुळे गिलकडे पुन्हा एकदा वनडे संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता प्रबळ आहे.

वन डे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर सध्या पूर्णतः तंदुरुस्त नसल्याने चिंतेचा विषय ठरत आहे. सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱयावर खांद्याला झालेल्या दुखापतीनंतर तो क्रिकेटपासून दूर असून बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन करत आहे. अद्याप त्याला फिटनेस प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याचे बाहेर राहणे जवळपास निश्चित मानले जात आहे.