वर्ल्ड कप हिंदुस्थानातच खेळावा लागणार, सामने लंकेत हलविण्याची बीसीबीची मागणी; बीसीसीआयचा स्पष्ट नकार

बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमानला कोलकाता नाईट रायडर्स संघातून बाहेर काढल्यानंतर बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी)आक्रमक भूमिका घेत हिंदुस्थानातील सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली. मात्र बीसीसीआयनेही ठाम भूमिका घेत हा खेळ आहे, खेळणं नव्हे. त्यामुळे नियोजित सामने स्थानांतरित करणे शक्य नाही. सामने हिंदुस्थानातच खेळावे लागणार असल्याचे सांगत त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता हा वाद दिवसेंदिवस टी-20 क्रिकेटसारखा अधिक स्पह्टक होणार, हे निश्चित आहे.

टी-20 वर्ल्ड कप आता अवघ्या 33 दिवसांवर येऊन ठेपलाय आणि त्याचदरम्यान बांगलादेशमध्ये माजलेली राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे उद्भलेल्या घडामोडींनी आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपला अडचणीत आणले आहे.  या वादाला राजकीय रंग लागल्यामुळे हा भडका आणखी तीव्र होतो की बीसीसीआय या भडक्याची आग तत्काळ विझवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

3 जानेवारीला बीसीसीआयने आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाला स्पष्ट आदेश देत बांगलादेशच्या डावखुऱया वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला संघातून करारमुक्त करण्यास सांगितले. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला, जेव्हा बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर हिंसक हल्ल्यांच्या घटना समोर आल्या आणि त्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंदुस्थानात आश्रय घेतल्याचे वृत्त होते. मुस्तफिजूरला संघाबाहेर काढल्यानंतर संतप्त झालेल्या बांगलादेशच्या क्रीडा मंत्रालयाने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आदेश दिले की, सुरक्षेचे कारण देत टी-20वर्ल्ड कपमधील गट सामने हिंदुस्थानातून श्रीलंकेत हलवण्याची मागणी आयसीसीकडे करावी.

 बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने पीटीआयशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘कोणाच्या इच्छेवर सामने हलवता येत नाहीत. हा संपूर्ण प्रकार म्हणजे प्रचंड लॉजिस्टिक डोकेदुखी आहे. संघांचे विमान तिकीट, हॉटेल बुकिंग आधीच झालेले आहेत. दररोज तीन सामने खेळणे जाणार आहे, प्रसारण पथक, तांत्रिक यंत्रणा, कर्मचारी सगळं आधीच ठरले आहे. हे आयोजन म्हणजे खेळ आहे, खेळणं नव्हे.’ हा प्रश्न फक्त संघांचा नसून, प्रसारण हक्क, वेळापत्रक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाशी संबंधित गंभीर बाब आहे. जे आता स्थलांतरित करणे खूप त्रासदायक आहे.

या वादाला आणखी धार देत बांगलादेश सरकारचे सल्लागार यांनी थेट माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठवत बांगलादेशात आयपीएलचे थेट प्रक्षेपण बंद करण्याची मागणी केली. आमच्या क्रिकेटचा, खेळाडूंचा किंवा देशाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. गुलामगिरीचे दिवस संपले आहेत, असा आक्रमक इशारा त्यांनी दिला.

आगामी बांगलादेश दौराही संकटात

सध्या सुरू झालेल्या राजकीय तणावाचा फटका द्विपक्षीय क्रिकेटलाही बसण्याची चिन्हे आहेत. सप्टेंबर 2026 मध्ये होणारी हिंदुस्थानची बांगलादेश दौऱयाची योजना आता संकटात सापडली असून पुनर्नियोजित दौऱयाबाबतही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सध्याची स्थिती पाहता या दौऱयालाही स्थगिती दिली जाऊ शकते किंवा बीसीसीआयकडून हा दौरा रद्द केला जाऊ शकतो. हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यातील संबंधही संपुष्टात आणू शकतो.