शेअर बाजारात प्रॉफिटचे आमिष, 200 कोटी ऑनलाइन गंडा; आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद

मॅट्रीमोनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा मीरा-भाईंदर पोलिसांनी पदार्फाश केला आहे. सर्वसामान्यांना २०० कोटींचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या सात आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रोशनकुमार शेट्टी, साबिर खान, सनद दास, राहुलकुमार राकेशकुमार, आमिर शेरखान, अभिषेक नारकर, मोहम्मद बलोच अशी अटक आरोपींची नावे आहेत.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतील बापाने गावातील शिवसाई रेसिडन्सी लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग येथे काही व्यक्ती ऑनलाइन फ्रॉडचे पैसे बेकायदेशीर मार्गाने स्वतःच्या खात्यात घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले. यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन जणांची नावे पोलिसांना सांगितली. पोलिसांनी त्यांनादेखील बेड्या ठोकल्या. हे आरोपी मॅट्रीमोनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांशी ओळख वाढवायचे. त्यांचा विश्वास संपादन करून फॉरेक्स आणि गोल्ड ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून गंडा घालायचे. आरोपींविरोधात मीरा रोड, नायगाव, वरळी, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, धुळे, पिंपरी-चिंचवड, राजस्थान, धुळे, गुजरात, दिल्ली, हरयाणा अशा विविध ठिकाणी ५१ गुन्हे दाखल आहेत.

घरफोड्याला बेड्या

पालघर – घरफोडी करून पसार झालेल्या आरोपीला सफाळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हारुन शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. देवीपाडा येथे राहणारे विमल पासवान यांच्या घराची खिडकी तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. चोरट्याने ६८ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपीला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला.