
>> वैश्विक
सूर्यासारख्या जनक ताऱ्याचं आणि पृथ्वीचं नातं पृथ्वीच्या जन्मापासून अतूट आहे व ते आणखी अनेक अब्ज वर्षे तसेच राहणार आहे. पाच अब्ज वर्षांनी कायमचा ‘सूर्यास्त’ होईल आणि आपल्या ग्रहमालेची एकूणच अंधारयात्रा सुरू होईल, परंतु सूर्याच्या गाभ्यातील नैसर्गिक अणुभट्टी जोपर्यंत धगधगत आहे, तोपर्यंत त्यातील हायड्रोजनचे हिलियममध्ये रूपांतर होणार आणि त्यातून निर्माण झालेल्या ऊर्जेचे लोट कधी प्रकाशाच्या, तर कधी सौरज्वालांच्या रूपानेही सूर्यपृष्ठावरून बाहेर पडत राहणार.
यापैकी सौरज्वालांच्या वाढत्या काळात सूर्यावरील भारीत कण अधिक प्रमाणात येऊन पृथ्वीच्या वातावरणाला टक्करले की, निर्माण होणारे विलोभनीय प्रकाशझोत पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांच्या प्रदेशात दिसू लागतील. बाकी रोजचा सूर्य उगवला म्हणजे पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी पूर्ण झाली की, उगवत्या सूर्याची आपल्यापर्यंत येणारी किरणे सुमारे सवाआठ मिनिटांनी आपल्याला दिसतील. याचाच अर्थ सूर्यप्रकाशाचं दर्शन आपल्याला होण्याआधीच तो सवाआठ मिनिटं आधी उगवलेला असेल.
15 कोटी किलोमीटर अंतर पार करून पृथ्वी नावाच्या पाणीदार ग्रहावर पडणारी सूर्यकिरणे म्हणजे पृथ्वीवरच्या सर्व सजीवांची संजीवनी. झाडापानांपासून सूक्ष्म कीटक, महाकाय प्राणी-पक्षी आणि माणसाचंही जीवन या सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे. तेव्हा सूर्यप्रकाश आपला जीवनदाता आणि त्रातासुद्धा. त्यामुळे त्याची आराधना करून कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा सुरू झाली.
मात्र सूर्यप्रकाश ज्या वेळी सुखावतो ती कोवळी किरणं वगळता अनेकदा त्याच्या ‘तापा’पासून आपल्याला आपला बचावही करावा लागतो. उन्हाळा ‘कडक’ होऊ लागला की, आपण हैराण होतो. तो होण्याची कारणं अनेक. सध्या तर ‘ग्लोबल वॉर्मिंग’ने जागतिक तापमान वाढवलंय. ‘क्लायमेट चेंज’मुळे पृथ्वीवरचं नैसर्गिक ऋतुचक्र बहकलंय.
अर्थात, या गोष्टींना सूर्य जबाबदार नाही. मात्र त्यावरील सौर वादळं, सौरज्वाला यांच्या चक्रकाळात केव्हातरी त्याचा खरा प्रकोप जाणवतो. उपग्रह संदेश यंत्रणेपासून अनेक यंत्रांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यातच आता अवकाशी कार्यक्रम वाढत असल्याने त्याचा फायदा घेणाऱया पृथ्वीवासीयांना कधीतरी त्याचा तोटाही सहन करावा लागणारच.
या सौर‘कथे’चं निमित्त म्हणजे गेल्या 4 आणि 5 तारखांना (जानेवारी) पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातला उन्हाळा अतितीव्र झाला. सध्या सूर्य ‘दक्षिणायन’ सोडून ‘उत्तरायण’ करू लागल्याला पंधरा-सतरा दिवस झालेत. याचा अर्थ तो अजूनही 22 मार्चपर्यंत पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धावरच प्रकर्षाने तळपणार आहे. तसा तो मार्चनंतर जून-जुलैपर्यंत आपल्या उत्तर गोलार्धावरही तळपेल. तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा आणि आपल्याकडे उन्हाळा असेल.
आता मात्र स्थिती अगदी याउलट आहे. आपल्याकडे थंडी आणि न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांत भयंकर उन्हाळा होतोय. कुणी म्हणेल हे वार्षिक ऋतुचक्रच आहे, त्यात नवीन काय? तसं नवीन काहीच नाही, परंतु पृथ्वी सूर्याच्या जवळ कधी असते नि लांब कधी याचं गणित अनेकांना ठाऊक नसतं म्हणून ही माहिती. आपण सूर्य माथ्यावर आला, दक्षिण गोलार्धात गेला, संक्रांतीनंतर त्याचा ‘दिवस’ मोठा होईल असं म्हणतो. मात्र स्थिर सूर्य यातलं काहीच करत नाही.
आपल्या ग्रहावरचं ऋतुचक्र केवळ आणि केवळ पृथ्वीच्या साडेतेवीस अंश कललेल्या अक्षावर व तिच्या सूर्याभोवती फिरण्याच्या लंबवर्तुळाकार गतीवर बेतलेलं आहे. सूर्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर असणारी पृथ्वी या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे कधी सूर्याजवळ, तर कधी त्यापासून किती अंतर ‘राखून’ फिरते हे जाणणं मनोरंजक ठरेल.
पृथ्वी तिच्या कक्षेत जेव्हा सूर्यापासून लांब असते तेव्हा सूर्य-पृथ्वी अंतर 15 कोटी 20 लाख किलोमीटर असतं आणि ती सूर्यानजीक असताना 14 कोटी 70 लाख किलोमीटर होतं. पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असण्याचा काळ सध्या आहे तोच. मग प्रश्न असा की, आता आपल्याकडे अधिक उन्हाळा असायला हवा तसा तो असतोच, पण पृथ्वीच्या कलत्या अक्षामुळे सध्या सूर्य दक्षिण गोलार्धावर आग ओकत असल्याने आपल्याला त्याच्या झळा बसत नाहीत. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, द. अमेरिका येथील उन्हाळा सर्वात कडक असतो. कारण सूर्य 4 जानेवारीला पृथ्वीजवळ होता. या आठवड्यातही फार दूर नाहीच. आपल्याकडे सूर्य तळपतो तेव्हा मात्र तो पृथ्वीपासून लांब असल्याने 4 जुलैला पृथ्वी-सूर्य अंतर सर्वाधिक असतं. परिणामी आपल्याकडचा उन्हाळा दक्षिण गोलार्धातल्यासारखा तीव्र नसतो. शिवाय त्याच काळात आपल्याकडे भरपूर पाऊसही पडत असल्याने आभाळ मेघाच्छादित असतं.
दरवर्षी 365 दिवसांत पृथ्वी सुमारे 94 कोटी 20 लाख किलोमीटर अंतराळ भ्रमंती करून 365 दिवसांत सौरपरिक्रमा पूर्ण करते. तीसुद्धा सेपंदाला 30 किलोमीटर या गतीने! आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित अशा या घटना, पण बहुतेकांना ठाऊक नसलेल्या! ‘खगोला’च्या अभ्यासाचा हाच तर फायदा.






























































