
राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होत आहेत. मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये प्रभाव पद्धती आहे. चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात आला आहे. अशावेळी मतदारांनी चार मते दिल्याशिवाय मतदान पूर्ण होणार नाही. कोणताच उमेदवार पसंत नसेल तर शेवटी ‘नोटा’चे बटन दाबून मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
प्रभाग पद्धतीनुसार अ, ब, क आणि ड या नुसार चार उमेदवारांना निवडून देण्याची जबाबदारी मतदारांवर आहे. परंतू, प्रभागात मतदारांना काही उमेदवारांना पसंती नसते. त्यामुळे मतदान दोन किंवा तीनच उमेदवारांना मत देऊन बाहेर पडतात. मात्र, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, प्रत्येक मतदाराला चार मते द्यावी लागतील. चार उमेदवारांसमोरचे ईव्हीएमचे बटन दाबल्याशिवाय मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
बहुसदस्य निवडणूक पद्धत काय आहे?
मतदान प्रक्रिया ही बहुसदस्य निवडणूक पद्धतीने पार पडणार आहे. यामुळे प्रत्येक मतदाराला चार मते देण्याचा अधिकार आहे. प्रत्येक प्रभागात चार जागा आहेत. त्यांना ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, याप्रमाणे नाव देण्यात आले आहेत. प्रत्येक जागेच्या मतपत्रिकेला वेगवेगळा रंग दिलेला आहे. जागा ‘अ’साठी पांढरा, जागा ‘ब’साठी फिका गुलाबी, जागा ‘क’साठी फिका पिवळा आणि जागा ‘ड’साठी फिका निळा रंग देण्यात आला आहे.






























































