रोज खा मटण अन् कमळाचे दाबा बटण; अशोक चव्हाण यांचे वादग्रस्त विधान, काँग्रेसची जहरी टीका

भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमधील वाघाळा महापालिका निवडणुकीचा प्रचार करताना वादग्रस्त विधान केले आहे. तरोडा येथील भाजपच्या सभेत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, रोज खा मटण अन् कमळाचं दाबा बटण. अशोक चव्हाण यांच्या या वादग्रस्त विधानावर काँग्रेसने जहरी टीका केली आहे. असे विधान करणारे नेते हे अशोक चव्हाण नव्हे, तर आदर्श चव्हाण आहेत, अशा शब्दांत काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.

भाजपने आयोजित केलेल्या सभेत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, सध्या निवडणूक सुरू आहे. सर्वच लोक पाटर्य़ा खाऊ घालतील. याची पार्टी, त्याची पार्टी… मी तर म्हणेन रोज खा मटण, परंतु कमळाचे दाबा बटण. एवढे काम करा. नाहीतर एकाचे मटण खाऊन दुसऱ्याला मतदान कराल. मी काही मटण देणार नाही, पण सांगितलेले लक्षात घ्या, असे ते म्हणाले. अशोक चव्हाण यांनी या वेळी आपल्याला सोडून गेलेल्यांची राजकीय कारकीर्द संपल्याचाही दावा केला. जे गेले त्यांना जाऊ द्या. त्याने आपल्याला काही फरक पडत नाही. एक गेला आणि दुसरा आला. जे मला सोडून गेले ते बरबाद झाले, असे ते म्हणाले.

काँग्रेसकडूनआदर्श चव्हाणउल्लेख

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अशोक चव्हाण यांच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी अशोक चव्हाणांचा उल्लेख ‘आदर्श चव्हाण’ असा केला आहे. आदर्श चव्हाण… अच्छा अशोक चव्हाण का? मला वाटले आदर्श चव्हाण. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते तेव्हा असे अजिबात करत नव्हते. आता पक्ष बदलल्यामुळे त्यांची संस्कृतीही बदलली आहे. म्हणजे मतदारांची किंमत त्यांनी एका मटणापुरती केली आहे. ही मतदारांचे महत्त्व कमी करणारी गोष्ट आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.