
टी-20 वर्ल्ड कप तोंडावर असताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) पुन्हा एकदा आयसीसीपुढे नवा वाद उभा केला आहे. अवघ्या पाच दिवसांत दुसरे पत्र पाठवत बांगलादेशने आपल्या सामन्यांचे यजमानपद हिंदुस्थानकडून काढून श्रीलंकेकडे सोपवण्याची मागणी केली आहे. ‘सुरक्षेची चिंता’ असा जुना, अस्पष्ट आणि संशयास्पद मुद्दा अन् बहाणा पुढे करत बीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे.
7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशला गट टप्प्यात चार सामने खेळायचे आहेत. यापैकी तीन सामने कोलकाता आणि एक सामना मुंबई येथे निश्चित आहेत. मात्र बांगलादेश संघाने अद्याप हिंदुस्थानात येण्यास स्पष्ट नकार दिल्याने जागतिक स्पर्धेपूर्वीच अनावश्यक गोंधळ निर्माण झाला आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार बांगलादेश क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ नजरुल यांच्या कठोर आणि टोकाच्या भूमिकेनंतर हे दुसरे पत्र पाठवण्यात आले. या प्रकरणात नजरुल यांचा हस्तक्षेप केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून त्यामागे राजकीय अजेंडा असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आयसीसीने ‘सुरक्षेच्या चिंतेचा ठोस आणि सविस्तर तपशील’ मागवला असून बीसीबीने तो सादर केल्याचा दावा केला आहे, मात्र ही माहिती आजवर सार्वजनिक करण्यात आलेली नाही. त्यामुळे बांगलादेशची भूमिका अधिक संशयास्पद ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर मुस्तफिजूरच्या आयपीएल सहभागाला तीव्र विरोध झाला. परिणामी, बीसीसीआयने त्याला आयपीएल खेळण्याची परवानगी नाकारली आणि 3 जानेवारी रोजी केकेआरने त्याला संघातून मुक्त केले. याच घटनेनंतर बांगलादेशची भूमिका अधिक आक्रमक आणि सूडभावनेची बनल्याचे स्पष्ट दिसून आले.
नेमका वाद कुठून पेटला?
16 डिसेंबर रोजी झालेल्या आयपीएल मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला तब्बल 9.20 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हत्यांच्या घटनांनी वातावरण तापले. आतापर्यंत सहा हिंदूंची हत्या झाल्याचे वृत्त असून याचे पडसाद हिंदुस्थानातही उमटले.
आयपीएल प्रसारणावर बंदी; वर्ल्ड कपवरही दबाव
मुस्तफिजूरची मुक्तता झाल्यानंतर बांगलादेश सरकार आणि बीसीबीने थेट आयपीएल सामन्यांच्या प्रसारणावर बंदी घातली. एवढय़ावर न थांबता हिंदुस्थानात वर्ल्ड कप सामने खेळण्यास नकार देत आयसीसीकडे स्थळ बदलण्याची मागणी करणारे ई-मेल पाठवले. ही भूमिका केवळ क्रीडा स्पर्धांविरोधात नसून ती हिंदुस्थानविरोधी राजकीय भूमिका असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे.
‘आयसीसी’ची स्पष्ट भूमिका; बीसीबीमध्येच मतभेद
या प्रकरणावर आयसीसीने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी ‘नेमकी सुरक्षा जोखीम काय?’ याचे ठोस उत्तर बीसीबीकडून मागितले आहे. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डातच मतभेद उफाळून आले आहेत. एक गट आसिफ नजरुल यांच्या टोकाच्या भूमिकेचे समर्थन करत आहे, तर दुसरा गट बीसीसीआय आणि आयसीसीसोबत चर्चेचा मार्ग स्वीकारण्याच्या बाजूने आहे.






























































