बापानेच केली जुळ्या चिमुकल्यांची हत्या

कौटुंबिक वादातून बापानेचे चिमुकल्या जुळ्या मुलांची हत्या केल्याच्या घटनेने करमाळा हादरला आहे. तालुक्यातील केतूर गावात आज सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शिवांश सुहास जाधव आणि श्रेया सुहास जाधव (वय 7) अशी मृत्यू झालेल्या जुळ्या चिमुकल्यांची नावे आहेत, तर सुहास ज्ञानदेव जाधव (वय 32) असे नराधम बापाचे नाव आहे.

करमाळा तालुक्यातील केतूर येथे राहणारा सुहास जाधव याला शिवांश आणि श्रेया अशी दोन जुळी मुलगा व मुलगी होते. आज सकाळी कौटुंबिक वाद झाल्याने सुहास जाधव याने दोन्ही मुलांना हिंगणी येथील शेतात नेले आणि तेथील विहिरीत ढकलून दिले. या घटनेनंतर नराधम बापानेच फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय शेताकडे धावले. मात्र, तोपर्यंत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता.

माहिती मिळताच करमाळा पोलीस दाखल झाले. पोलिसांनी सुहास जाधव याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सुहास जाधव हा राज्य विद्युत मंडळात झरे येथे विद्युत ऑपरेटर म्हणून काम करतो.