शिवसेनाप्रमुखांनी भाजपला हिंदुत्त्वाचा मार्ग दाखवला! – संजय राऊत

मुंबई येथील पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला हिंदुत्त्वाचा मार्ग दाखवला, असे म्हटले आहे. ‘ज्याने भाजपला हिंदुत्वाच्या मार्गाने नेले ती शिवसेना खरी शिवसेना आहे. भाजपचे हिंदुत्त्व हे हिंदुत्त्व नाही, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला हिंदुत्त्वाचा मार्ग दाखवला हे त्यांनी मान्य केले पाहिजे. त्यामुळे उद्धव ठाकरे जे म्हणताहेत की तुम्ही मातोश्रीची बदनामी थांबवा, मातोश्री हे हिंदुत्त्ववादाचे सर्वात मोठे केंद्र आहे. मुंबई अदानीच्या घशात घालण्याचे कार्य थांबवा आणि जरूर मातोश्रीवर या. मातोश्रीच्या गेटवर तुमचे स्वागत करू असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे खरं बोलतात. शिवसेनेच्या नावाखाली त्यांनी सध्या जो गळ्यात धोंडा बांधून घेतलेला आहे. तो धोंडा त्यांना बुडवणार. भाजपने आपला एक सच्चा आणि कट्टर हिंदुत्ववादी मित्र गमावला आहे. त्यांनी वेश्येच्या गळ्यात मणीहार आणि पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा अशाप्रकारचे धोरण भाजपच्या अमित शहांनी बनवले आहे. अमित दादांच्या मागे हे सगळे मेंढरासारखे गेले आहेत अशी टीका राऊत यांनी केली.

मातोश्री हे हिंदुत्वाचे सर्वात मोठे केंद्र असून त्याची बदनामी थांबवावी, मुंबई अदानींच्या घशात घालण्याचे काम थांबवून फडणवीस यांनी खुशाल मातोश्रीवर यावे, आम्ही त्यांचे गेटवर स्वागत करू आणि सन्मानाने आत घेऊन जाऊ, असेही त्यांनी नमूद केले. पुढे राऊत म्हणाले, मी तर त्यांना कलानगरच्या गेटवर आणायला जाईन. पण हे थांबवा. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ठाकरे कुटुंबाची बदनामी करणे म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी माणसाची बदनामी करण्यासारखे आहे. ज्या बाळासाहेबांनी आपले आयुष्य मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी वेचले, त्यांच्याच कुटुंबावर चिखलफेक करणे चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचे व्यक्तिगत शत्रुत्व नाही. आम्ही ते राजकारणात कधी आणलंही नाही. भाजपने राजकारणात आणायला सुरुवात केली विशेष करुन अमित शहा दिल्लीच्या राजकारणात आल्यापासून राजकारणाची पातळी घसरल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आम्ही तेवढ्या कोत्या मनाचे किंवा दुष्ट बुद्धीचे नाही. हे देवेंद्रजींना चांगल्या प्रकारे माहित आहे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.