
>> नीलेश कुलकर्णी
भाजपचे सरचिटणीस व उत्तराखंडचे प्रभारी, संघाच्या मुशीतून तयार झालेले दुष्यंतकुमार गौतम यांचा अंकित भंडारी बलात्कार आणि खून प्रकरणाशी थेट संबंध असल्याची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाल्यामुळे उत्तराखंड हादरले आहे. तेथील मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी हे भगतसिंग कोशारी या विक्षिप्त गृहस्थांचे शागिर्द आहेत. त्यामुळेच उत्तराखंडमधील ‘हरी की पौडी’सह 105 पवित्र घाटांवर गैरहिंदूंना ‘नो एण्ट्री’ करण्याचा विचार करून ते देवभूमीत सनातन शहरांचे उफराटे राजकारण करीत आहेत. तसेच दुष्यंत गौतम यांना वाचविण्याचा त्यांचा आटापिटा सुरू आहे.
‘देवभूमी’ उत्तराखंडचे राजकारण सध्या अंकिता भंडारी या रिसेप्शनिस्ट मुलीच्या आर्त किंकाळ्यांनी ढवळून निघाले आहे. अंकितावर झालेला सामूहिक बलात्कार व त्यानंतर झालेला तिचा खून यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. भाजपचे सरचिटणीस व उत्तराखंडचे प्रभारी, संघाच्या मुशीतून तयार झालेले दुष्यंतकुमार गौतम यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाल्यामुळे देवभूमी हादरून गेली आहे. चाल चरित्र व चेहऱयाची जपमाळ ओढणाऱ्या भाजपचे ‘चरित्र’ देवभूमीतच उघडे पडले आहे! त्यावर उपाय म्हणून आता तिथल्या भाजपच्या पुष्करसिंग धामी सरकारने काय करावे? तर अंकिता प्रकरणातील आरोपींना शिक्षा करण्याऐवजी त्यांनी ‘हरी की पौडी’सह उत्तराखंडमधील 105 पवित्र घाटांवर गैरहिंदूना ‘नो एण्ट्री’चा निर्णय घेण्याचा मानस बोलून दाखवला आहे. शिवाय ते पवित्र हरिद्वार व हृषिकेश या शहरांना ‘सनातन पवित्र शहर’ म्हणून घोषित करणार आहेत. ही अशी हिंदुत्वाची शाल पांघरली की मग भ्रष्टाचार, बलात्कार व खुनांच्या प्रकरणावर पडदा पडतो, असे धामी यांना वाटत असावे. मुद्दा अंगलट आला की हिंदुत्वाची शाल पांघरायची आणि पवित्र व्हायचे, हा भाजपाच्या सत्ताकारणाचा गेल्या अकरा वर्षांतील शिरस्ता बनलेला आहे.
उत्तराखंडमधील अंकिता भंडारी प्रकरणी विरोधी काँगेस पक्ष ‘निद्रिस्त’ अवस्थेत आहे. त्याचा जाब प्रियंका गांधी यांनी दिल्लीत काही काँगेसजनांना बोलावून विचारला. काँगेस मौनात असली तरी जनता प्रक्षुब्ध आहे. शिस्तप्रिय म्हणविल्या जाणाऱया भाजपतली गटबाजीही या प्रकरणाला हवा देत आहे. प्रकरण इतके संवेदनशील आहे की, जनता रस्त्यावर येऊ शकते. मात्र भाजपकडे अशा गुन्हेगारांची पापे झाकणारी ‘हिंदुत्वाची शाल’ आहे. मुख्यमंत्री पुष्कर धामी हे दुष्यंत गौतम यांच्या पापावर हिंदुत्वाच्या शालीचे पांघरुण घालत आहेत. हरिद्वार व हृषिकेश ही अनादी कालापासून सनातन पवित्र शहरेच आहेत. याच पवित्र शहरांमध्ये व पवित्र देवभूमीत अंकिताचा जीव गेला. मात्र या प्रकरणात दुष्यंत गौतम कसे अडकणार नाहीत, यासाठी धामी आपली सगळी ताकद पणाला लावत आहेत. हा नरेंद्र मोदींचा ‘न्यू इंडिया’ असा आहे!
पांडियन… पांडियन!!
नवीन पटनायक यांच्या राजकारणासह त्यांचा बिजू जनता दल नावाचा अख्खा पक्ष रसातळाला नेऊन बुडविणारे पटनायक यांचे माजी खासगी सचिव कार्तिकेयन पांडियन हे पुन्हा चर्चेत आले आहेत. पांडियन यांच्यावर असंख्य आरोप आहेत. मात्र नवीनबाबूंनी त्याकडे कायम कानाडोळा केला आणि नवीनबाबूंच्या ओडिशातील निर्विवाद सत्ता व लोकप्रियतेला ओडिशाच्या समुद्रकिनारी कायमची जलसमाधी मिळाली. पांडियन हे नवीनबाबू मुख्यमंत्री असताना इतके पॉवरफूल होते की त्यांच्या शब्दाशिवाय प्रशासनात पानही हलत नसे. ज्या गोष्टी नवीन पटनायक करू शकायचे नाहीत ते हे महाशय करून दाखवायचे. पांडियन हे तमिळनाडूचे, त्यांच्या पत्नीदेखील आयएएस. भ्रष्टाचाराची प्रकरणे अंगलट येतील, हे लक्षात आल्यावर या दांपत्याने व्हीआरएस घेतली. दरम्यानच्या काळात दिल्लीशी संधान साधले. दिल्लीच्या सांगण्यावरूनच पांडियन यांनी नवीनबाबूंचा टांगा पलटी केल्याचीही चर्चा ऐकायला मिळते. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव असताना पांडियन हे प्रोटोकाल फाटय़ावर मारत मुख्यमंत्र्यांना घरी ठेवून एकटेच हेलिकाप्टरने फिरायये. त्यांच्या हवाई सफरीचे बिलच काही कोटींमध्ये आहे. त्यावरून ओडिशातील भाजप सरकारने त्यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. अर्थात पांडियन यांचे ‘आका’ दिल्लीत बसलेले असल्याने त्यांच्याविरोधात कितपत कारवाई होईल, याबद्दल साशंकताच आहे.
रेखाबाईंचा ‘ज्ञानकोष’
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड झाल्यानंतर ‘रेखा दिल्ली की भाग्यरेखा बनेगी’ अशी जाहिरातबाजी भाजपने केली होती. प्रत्यक्षात रेखाबाई या दिल्लीकरांसाठीच नाही तर भाजपसाठीही ‘अभाग्यरेखा’ सिद्ध होत आहेत. रेखा गुप्ता सतत वादात व नको त्या चर्चेत आहेत. दिल्लीतल्या कोणत्याही समस्येचे खापर त्या अरविंद केजरीवाल यांच्या माथी फोडून मोकळ्या होतात. छट पर्वावेळी कृत्रिम गंगा दिल्लीत यमुनेशेजारी अवतरित करण्याचे अवतारकार्य या रेखाबाईंचेच! प्रदूषणाच्या समस्येवरही त्यांनी केलेल्या बालीश विधानाची जगभरात छी-थू झाली. नवा वाद त्यांनी शहीद भगतसिंग यांच्याबाबत केला आहे. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू हे इंग्रजांविरोधात नाही तर बहिऱया, बधीर काँगेस सरकारविरोधात लढले. त्यांनी काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ त्या वेळच्या सेंट्रल अॅसेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला, असा जावईशोध या बाईंनी लावला आहे. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या राष्ट्रपुरुषांचे योगदान शालेय विद्यार्थ्यांनाही माहिती आहे. मात्र इतिहासाची एबीसीडी माहिती नसलेल्या रेखा यांनी नाहक वाद निर्माण केला आहे. यावरून काँग्रेस व आम आदमी पार्टीने गुप्ता यांच्यावर हल्लाबोल केला आहे. वाचन, व्यासंग यांच्याशी भाजपच्या सध्याच्या मंडळींचा दूरदूर संबंध नाही. त्यामुळे दिल्लीतील महाशक्तीने आपल्या अंकित राहतील, असेच नमुने विविध राज्यांत मुख्यमंत्री पदी बसवले आहेत. रेखा यांच्यापेक्षा केजरीवाल कित्येक पटीने चांगले होते, अशी पश्चातापाची भावना दिल्लीकरांची झाली आहे.































































