
गेल्या २५ वर्षात कोट्यवधीचा निधी आणून विकास केला असा भास निर्माण करुन नांदेडकरांची फसवणूक करणार्या व भ्रष्टाचार व गैरव्यवहाराच्या माध्यमातून पैसा गोळा करुन जनतेची मते विकत घेण्याचे पाप करणार्या मंडळींना नांदेडकरांनी या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवून अन्यायाविरुध्द भ्रष्टाचाराविरुध्द लढणार्या शिवसेना उमेदवारांची मशाल पेटवून १५ तारखेला शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.
नांदेडच्या प्रभाग क्र.१ व २ मधील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रियंका काकडे, रवी नागरगोजे, शितल कलाने, विजय कल्याणकर, अपर्णा गजानन देशमुख यांच्या प्रचारार्थ तरोडा भागात झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. या सभेला शिवसेनेचे लातूरचे संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, महानगरप्रमुख प्रकाश मारावार, तालुकाप्रमुख सुनिल पाटील, बाबुराव मोरे, तानाजी पाटील, सुरेश देशमुख, बंडू देशमुख, माधवराव कल्याणकर, नवनाथ पाटील, डॉ.बालाजी पेनूरकर, प्रियंका कुंभार आदी उपस्थित होते.
आपल्या तडफदार भाषणात सुषमा अंधारे यांनी नांदेडसह महाराष्ट्रात होत असलेल्या अन्याय, अत्याचाराचा समाचार घेतला. चिमुकल्या लेकरावर, सुशिक्षित डॉक्टरवर अत्याचार करून त्यांना मारून टाकणारे नराधम ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाच्या मंडळींना पुन्हा निवडून द्यायचे की नाही हे आता तुम्हाला ठरवायचे आहे. बदलापूरची घटना आहे, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील घटना असो, डॉ. संपदा मुंढे यांच्यावर झालेला अत्याचार असो, या सर्व प्रकरणात भाजपाची मंडळी आहेत. त्यांना कोण पाठिशी घालत आहे, याचा शांतपणे विचार करा.
ज्या शहरावर २५ वर्ष अधिराज्य अशोक चव्हाणांनी गाजवले, त्यांच्यासमोरच मुख्यमंत्र्यांनी या शहराचा विकास झाला नसल्याची कबुली दिली. यातच सगळे आले. मोठ्या प्रमाणात निधी येऊन शहरातील पाणी, रस्ते, ड्रेनेज, वाहतूक आदींच्या समस्या सुटू शकल्या नाहीत. निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन तोच पैसा निवडणुकीत वापरून दोन हजार रुपयाला मत विकत घेणार्या मंडळींपासून सावध राहून सतर्क राहा, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणुकीच्या माध्यमातून एमआयडीसी आणतो, समुद्र आणतो, नद्या आणतो, म्हणून भुलथापा देणार्या मंडळींपासून सावध रहा. ज्या सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या जागेत ड्रग्जचा कारखाना सापडला, त्याची पाठराखण सरकार करते. त्यामुळे या राज्यात काय चालले आहे, हे समजेल. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा कमवून त्याच माध्यमातून जनतेची मते विकत घेणार्या मंडळींना धडा शिकवून सर्वसामान्य जनतेच्या सेवेत राहणार्या शिवसेनेच्या शिलेदारांना निवडून देण्याची ही वेळ आहे. आदर्श घोटाळ्यातून व अन्य घोटाळ्यातून पैसा कमविणार्या मंडळींना धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले.
देशात लोकशाही धोक्यात आली आहे. संविधान धोक्यात आले आहे, निवडणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या यंत्रणाचा वापर करून निवडणुका जिंकायच्या, यापुढे तर निवडणुका होतील की नाही याबद्दल माझ्या मनात प्रश्नचिन्ह आहे. शहराचे वाटोळे करणार्या गोदावरी दूषित करणार्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन पैसे कमविणार्या मंडळींना या निवडणुकीत धडा शिकवा आणि शिवसेनेच्या मशाल चिन्हावर बटन दाबून शिवसेनेचे प्रामाणिक शिलेदार निवडून द्या, असे आवाहन संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण यांनी केले.

































































