
>> मच्छिंद्र ऐनापुरे
प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय संकट ही भविष्यातील नाहीत, तर आजचीच वास्तव समस्या आहे. याकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर अंदाधुंद विकासाची किंमत आपल्याला आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रचंड मोजावी लागेल. शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या उपाययोजना, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक संसाधनांचा समतोल वापर आणि सर्वांची सामूहिक जबाबदारी यातूनच या संकटावर मात करता येईल. अन्यथा विकासाच्या नावाखाली आपण स्वतःचाच विनाश ओढवून घेतो आहोत हे वास्तव स्वीकारावे लागेल.
जगातील अनेक देश आज प्रदूषणाच्या संकटाशी झुंज देत असले तरी भारतात या समस्येने अत्यंत गंभीर आणि भयावह स्वरूप धारण केले आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि तथाकथित विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा होत असलेला ऱहास आता थेट मानवी जीवनावर घाला घालू लागला आहे. नुकताच पर्यावरण आणि प्रदूषणाविषयी ‘लॅन्सेट’ या नामांकित आंतरराष्ट्रीय नियतकालिकाचा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाला. त्यानंतर मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात कार्य करणाऱया ‘इमोनीड्स’ या संस्थेचाही अहवाल समोर आला. या दोन्ही अहवालांनी केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगालाच हादरवून सोडले आहे. विशेषतः भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कारण विकासाच्या गतीसोबत पर्यावरण संरक्षणाचा समतोल राखण्यात आपण अपयशी ठरत आहोत. प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक असलेली राजकीय इच्छाशक्ती, दीर्घकालीन धोरणे आणि कडक अंमलबजावणी यांचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. याचे दुष्परिणाम आता केवळ निसर्गावरच नव्हे, तर थेट मानवी आरोग्यावर दिसून येत आहेत.
‘लॅन्सेट’ आणि ‘इमोनीड्स’च्या अहवालानुसार वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) सातत्याने 400 च्या वर राहणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे. एवढय़ा उच्च पातळीवरील प्रदूषणामुळे लोकांच्या शारीरिक आरोग्याला मोठा फटका बसत असून मानसिक आरोग्यही गंभीर धोक्यात आले आहे. आज लहान मुलेसुद्धा या संकटाच्या कचाटय़ात सापडली आहेत. शाळकरी वयातील मुलांमध्ये श्वसन विकार, एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्तीशी संबंधित समस्या वाढताना दिसत आहेत. प्रदूषणामुळे केवळ दमा, खोकला किंवा श्वसनाचे त्रासच वाढले नाहीत, तर हृदयविकार, उच्च रक्तदाब, अॅलर्जी यांसारख्या आजारांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या न्यूरोलॉजिकल आजारांचा धोका वाढत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, प्रदूषणामुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. परिणामी, अनेकदा अँटिबायोटिक औषधेही प्रभावी ठरत नसल्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
ऋतुचक्र बिघडतेय
देशात सातत्याने वाढणाऱया प्रदूषणाचा परिणाम केवळ आरोग्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. याचा थेट फटका ऋतुचक्राला बसत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे हवामानात असामान्य बदल घडत आहेत. कधी अवकाळी पाऊस, कधी दीर्घकाळ दुष्काळ, तर कधी अचानक ढगफुटी अशा टोकाच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. हिमवृष्टीचे स्वरूप बदलत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. हिमनद हे आपल्या जलस्रोतांचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. ते नद्यांना पाणी पुरवतात, ढगांच्या निर्मितीस हातभार लावतात आणि शेतीसाठी आवश्यक ओलावा टिकवून ठेवतात. मात्र आज हिमवृष्टी कमी होत असून जे हिमनद तयार होतात तेही वेगाने वितळत आहेत. याचा परिणाम म्हणून अचानक पूर येण्याचे प्रमाण वाढले आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसारख्या राज्यांतील जलप्रलय हे याचे जिवंत उदाहरण आहे. परिणामी, लोकांचे जीवन अधिकाधिक अनिश्चित आणि असुरक्षित बनत चालले आहे. हीच जलवायू संकटाची भयावह वास्तविकता आहे.
प्रगती की आत्मघात?
या साऱया परिस्थितीत प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आपण कोणत्या दिशेने जात आहोत? प्रदूषण नियंत्रणासाठी केवळ भाषणे, घोषणाबाजी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप उपयोगाचे नाहीत. सरकारांनी ठोस, परिणामकारक आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवणे अत्यावश्यक आहे. मात्र दुर्दैवाने जागतिक पातळीवरही याबाबत दुहेरी भूमिका दिसून येते. प्रदूषणामुळे गरीब आणि विकसनशील देश मोठय़ा संकटात सापडले असताना आर्थिकदृष्टय़ा सक्षम देश या लढय़ात अपेक्षित योगदान देताना दिसत नाहीत. त्यांचा युक्तिवाद असा आहे की, कार्बन उत्सर्जन तिसऱया जगातील देशांकडून जास्त होत आहे, पण वास्तव हे आहे की, औद्योगिक क्रांतीपासून आजपर्यंत सर्वाधिक प्रदूषण करणारे हेच विकसित देश आहेत. तरीही जागतिक तापमानवाढीबाबत शक्तिशाली राष्ट्रांची उदासीनता चिंताजनक आहे.
मानवी असुरक्षितता
आधुनिकीकरणाच्या नावाखाली देशभरात सातत्याने पर्वत तोडले जात आहेत. खाणकामासाठी होणाऱया स्पह्टांमुळे पृथ्वी हादरत आहे. अनेक डोंगर दरड कोसळण्याच्या उंबरठय़ावर उभे आहेत. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यांसारख्या पर्वतीय राज्यांमध्ये ही परिस्थिती वारंवार अनुभवास येत आहे. भूपंप, दरडी कोसळणे, पूर यामुळे मानवी जीवन अक्षरशः धोक्यात आले आहे. त्यामुळे आता तरी सजग होण्याची वेळ आली आहे. हवामानाचा स्वभाव पूर्णपणे बदलत चालला आहे. पावसाळ्यात पाऊस पडत नाही आणि मान्सून परतण्याच्या काळात ढगफुटी होतात. मागील वर्षी हिमाचल प्रदेशातील कुल्लू ते मंडी जिह्यापर्यंत झालेला जलप्रलय हा इशाराच होता. निसर्गाने मानवाला स्पष्ट संदेश दिला आहे- वेळीच थांबा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील.
अरवली पर्वतरांग – एक इशारा
याच पार्श्वभूमीवर अरवली पर्वतरांगांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. दिल्ली, हरयाणा, राजस्थान आणि गुजरातपर्यंत पसरलेली ही पर्वतरांग थार वाळवंट आणि उत्तरेकडील मैदानी प्रदेशांमध्ये नैसर्गिक भिंत म्हणून कार्य करते. मात्र खनन माफियांच्या लालसेपोटी या पर्वतरांगेवर सातत्याने घाला घातला जात आहे. लहान लहान टेकडय़ांवरील बेकायदेशीर खनन कुणापासूनही लपलेले नाही. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी खनन पट्टय़ांवर बंदी घालण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही वेळोवेळी कठोर भूमिका घेतली आहे. एका पर्वतरांगेतील टेकडय़ांमधील अंतर आणि उंचीच्या निकषांनुसार खननास प्रतिबंध घालण्याचे आदेश देण्यात आले. नंतर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचा पुनर्विचार करत खनन पट्टय़ांवर अधिक कडक निर्बंध लादले. हे स्वागतार्ह पाऊल असले तरी ते पुरेसे नाही.
अरवली पर्वतरांगच नव्हे, तर देशातील सर्व पर्वतरांगा संरक्षित करणे ही काळाची गरज आहे. समस्या केवळ पर्वतांची किंवा भूपंपप्रवण भागांची नाही. दिल्लीपासून पंजाब, हिमाचलपर्यंत अनेक भाग भूपंपाच्या धोक्याच्या पट्टय़ात येतात. त्यामुळे या भागांत होणारा विकास भूपंपरोधक आणि पर्यावरणपूरक असलाच पाहिजे. प्रदूषणाचे खरे कारण शोधणे आणि त्यावर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. पराली जाळणे हा केवळ एक घटक आहे. मात्र अंदाधुंद शहरीकरण, वाहनांची वाढती संख्या, कचऱयाचे अपुरे व्यवस्थापन, औद्योगिक उत्सर्जन हे सगळे मिळून या संकटाला अधिक तीव्र करत आहेत. केवळ राजकारण करून किंवा एकमेकांवर दोषारोप करून प्रश्न सुटणार नाही.
प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय संकट ही भविष्यातील नाहीत, तर आजचीच वास्तव समस्या आहे. याकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर अंदाधुंद विकासाची किंमत आपल्याला आणि येणाऱया पिढय़ांना प्रचंड मोजावी लागेल. शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या उपाययोजना, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक संसाधनांचा समतोल वापर आणि सर्वांची सामूहिक जबाबदारी यातूनच या संकटावर मात करता येईल. अन्यथा विकासाच्या नावाखाली आपण स्वतःचाच विनाश ओढवून घेतो आहोत हे वास्तव स्वीकारावे लागेल.























































