
>> वैश्विक, [email protected]
15 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीचा काळ. खगोल अभ्यासात मकर संक्रांतीचे महत्त्व थोडे वेगळे. एकतर हा एकमेव वार्षिक सण नेहमीसारखा आपल्या चांद्र महिन्यानुसार न होता सौर कालगणनेप्रमाणे होणारा. सूर्याचे मकर राशीच्या पार्श्वभूमीवर सुरू होणारे भ्रमण किंवा मकर संक्रमणाचा आरंभदिन म्हणजे मकर संक्रांत. अर्थातच, सौर कालगणनेनुसार त्याचा दिनांक ठरलेला. पूर्वी यावर चर्चा झाली की, उत्तरायण आणि मकर संक्रमण एकाच वेळी असेल का? असले तरी दर 72 वर्षांनी संपातबिंदू एक अंश मागे जात असल्याने ती तारीख आता 21 डिसेंबर झाली आहे. त्या दिवसापासूनच दक्षिण गोलार्धावर तळपणारा सूर्य हळूहळू उत्तरेकडे भासमान प्रवास करू लागतो आणि त्याचे ‘न चालताही चालणे’ जाणवते ते केवळ पृथ्वीच्या साडेतेवीस अंश कलत्या अक्षामुळे. रोजची दिवस-रात्रही पृथ्वी या अक्षाभोवती फिरत असल्यानेच होते हे आता सर्व जाणतात. मात्र परंपरेने ‘मकर संक्रमण’ दिसल्यावरच संक्रांत साजरी करायची तर 14 किंवा क्वचित 15 जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागते. 21 डिसेंबरला कोणी ‘उत्तरायण दिवस’ साजरा करू शकेल आणि कालांतराने त्याची बदलती तारीखही आपोआप स्वीकारली जाईल.
दिवस-रात्रीचा उल्लेख आधी झाला. याचाच अर्थ दिवसाच्या 24 तासांपैकी सरासरी (कधी कमी, कधी जास्त) 12 तासच आपल्याला सूर्यदर्शन होऊ शकते. तेसुद्धा पृथ्वीवरच्या कोणत्या भागात आपण राहते त्यावर ठरते. त्याविषयी एका वेगळय़ा लेखात 21 मार्चच्या सुमारास माहिती घेऊ. आजचा विषय आहे तो सतत सूर्य निरीक्षणाचा. एक क्षणही न रखडता सतत सूर्य निरीक्षण पृथ्वीवरून शक्य नसलं तरी सूर्य-पृथ्वी यांच्या परस्पर गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रात अशा काही जागा आहेत की, जिथे या दोन्ही वस्तूंचे गुरुत्वाकर्षण समसमान होऊन त्या बिंदूपाशी ठेवलेली वस्तू (यान) स्थिर राहू शकते. यापैकी पृथ्वीच्या पलीकडे यान ठेवले तर ते विशाल अवकाशाकडे पाहत राहील. मात्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये ठरावीक अंतरावर एखादे यान स्थिर केले तर ते मात्र सतत सूर्याचे निरीक्षण करू शकेल.
पृथ्वी आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा समतोल साधणारे जे पाच बिंदू आहेत त्यांना इटालियन शास्त्रज्ञाच्या नावावरून ओळखले जाते. मात्र लिओनार्ड युलर या स्वीस संशोधकाला त्यातील एल 1 ते 3 पॉइंटस् ठाऊक होते. (1750) मात्र 1772 मध्ये लॅग्रॅन्ज यांनी त्यात 4 व 5 या बिंदूंची भर घातली. त्यामुळे या सिस्टमला त्यांचे नाव मिळाले. यापैकी नैसर्गिक स्थिरता लाभलेल्या 4 आणि 5 या बिंदूंपाशी निसर्गतःच काही दगडधोंडय़ांसारख्या वस्तू असू शकतात. खगोलीय अभ्यासासाठी पृथ्वीवरून पाठवली जाणारी याने तिथे स्थिर ठेवता येतात. असे दोन लॅग्रॅन्ज पॉइंट म्हणजे एल-1 आणि एल-2. यापैकी एल-1 हा बिंदू सूर्य-पृथ्वीच्या मध्ये पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर आणि एल-2 बिंदू पृथ्वीबाहेरच्या कक्षेत तेवढय़ाच अंतरावर असतो.
‘नासा’ची जेम्स वेब दुर्बिण अनंत अवकाशाचा वेध विनाअडथळा घेऊ शकते. कारण ती पृथ्वीपलीकडच्या एल-2 बिंदूवर स्थिरावली आहे. केवळ सूर्याचाच वेध घ्यायचा तर ते यान सूर्य-पृथ्वी यांच्यामधील स्पेसमध्ये असणाऱ्या एल-1 बिंदूवर स्थिर असले पाहिजे आणि आपले स्वतःचे आदित्य एल-1 हे यान याच बिंदूवर गेली दोन-अडीच वर्षे सातत्याने सौर निरीक्षण करून सूर्याच्या अंतरंगाची उत्तम माहिती पाठवत आहे. त्याने प्रथमच ‘कार्नेल’ सौर ज्वालेची सखोल माहिती पाठवली आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी सौर निरीक्षणासाठी सतीश धवन अंतराळ स्थानकावरून सूर्याच्या एकदशांश जवळ गेलेले आदित्य एल-1 यान 2024 च्या जानेवारीत योग्य जागी स्थिरावले आणि गेले. वर्षभर सूर्याच्या ‘डोळय़ाला डोळा भिडवून’ सौर ज्वालांची भरपूर, महत्त्वपूर्ण माहिती त्याने पाठवली आहे. 1500 किलो वजनाच्या या यानावर सौर ज्वाला (सोलार फ्लेअर), सौर वारे (सोलार विंड) आणि सूर्याचे मॅग्नेटिक फिल्ड यांचा अभ्यास व अवकाशावर तसेच पृथ्वीवर त्याचा होणारा परिणाम याचे सतत निरीक्षण करण्याची जबाबदारी आहे. सुमारे 5 वर्षांचा कार्यकाळ असणारे हे यान इतर अनेक संशोधक यानांप्रमाणे पुढे अनेक वर्षे काम करू शकते. कारण त्यावरील स्युट (एळघ्ऊ) आणि यूईएलसी उपकरणे प्रभावी आहेत. त्याद्वारे आदित्य एल-1 शोध यानाने सूर्यावरील वादळांचा पृथ्वीच्या मॅग्नेटिक फिल्डवर कसा परिणाम होतो ते स्पष्ट केले आहे.
सूर्य ही एक विशाल नैसर्गिक अणुभट्टी असून त्याच्या गाभ्यात हायड्रोजन वायूचे व्हिलियममध्ये रूपांतर होत असते. या प्रक्रियेतून जी प्रचंड ऊर्जा निर्माण होते त्याचा एक भाग म्हणून आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो. म्हणजे जेव्हा आपण उन्हात जातो तेव्हा साक्षात सूर्याचा स्पर्शच आपल्याला होत असतो! सूर्याचे पृष्ठभागावरचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस इतके असते. त्याचे केवळ खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळीच दिसणारे प्रभामंडळ सूर्याभोवती 7 ते 14 दशलक्ष किलोमीटर पसरलेले आहे. त्याचे सूर्यापासूनचे अंतर सौर वाऱयांच्या तीव्रतेनुसार बदलते. काही वेळा तर 80 लाख किलोमीटरपर्यंत त्यातील तरंग (लाटा) पोहोचतात.
त्याचप्रमाणे सौर ज्वाला 10 लाख किलोमीटरपर्यंत उसळत असतात. या तप्त लहलहत्या सौरजिव्हांची रुंदी 48 किलोमीटरपर्यंत मोजली गेली आहे. सूर्याचे मॅग्नेटिक फिल्ड किंवा ‘हेलिओस्फिअर’ तर ग्रहमालेच्याही पलीकडे जाते. या सगळ्याची निरीक्षणे करून आणि सौर ज्वालांच्या 11 वर्षांच्या चक्राचा अभ्यास करून पृथ्वीच्या वातावरणावर तसेच माणसाने सोडलेल्या कृत्रिम उपग्रह व अवकाशी उपकरणांवर तसेच आपल्याकडची गॅजेटस् ज्यावर अवलंबून आहेत त्या संदेशवहनावर काय (बरा-वाईट) परिणाम होतो याचा आदित्य एल-1 यान यशस्वीरीत्या डेटा पाठवत आहे.























































