इराण पेटले… परिस्थिती चिघळली; अमेरिकेपाठोपाठ हिंदुस्थानचेही नागरिकांना तत्काळ देश सोडण्याचे आवाहन

राजकीय अस्थिरता, हिंसाचार यामुळे इराणमधील परिस्थिती अत्यंत स्पह्टक बनली असून आतापर्यंत अडीच हजारांवर आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेपाठोपाठ केंद्र सरकारने महत्त्वाची अॅडव्हायजरी जारी केली आहे. इराणमध्ये असणारे हिंदुस्थानी नागरिक, व्यावसायिक, विद्यार्थी, पर्यटक यांनी तत्काळ देश सोडावा, असे आवाहन केले आहे. दरम्यान, अमेरिकेकडून इराणवर हल्ला केला जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने 5 जानेवारी रोजी इराणमधील आपल्या नागरिकांसाठी सूचना जारी केल्या होत्या. मात्र आज अॅडव्हायजरी जारी करीत तत्काळ इराण सोडण्याचे आवाहन केले आहे. हिंदुस्थानी नागरिकांनी व्यावसायिक उड्डाणांसह उपलब्ध असलेल्या कोणत्याही साधनांचा वापर करून इराण सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तेहरानमधील हिंदुस्थानी दूतावासाने आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. कोणत्याही निदर्शनापासून किंवा गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहावे. परिस्थिती सातत्याने बदलत आहे. ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवावे. तसेच हिंदुस्थानी नागरिकांनी इमिग्रेनशी संबंधित सर्व कागदपत्रे, पासपोर्ट, ओळखपत्रे सोबत ठेवावीत. कोणत्याही प्रकारची मदतीची गरज भासल्यास त्वरित दूतावासाशी संपर्क करावा, अशा सूचना दिल्या आहेत. दूतावासाने संपर्क क्रमांकही जारी केले आहेत.

अमेरिकेचा कतारमधील एअरबेस कार्यान्वित

अमेरिकेकडून इराणवर हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकन हवाई दलाने कतारमधील आपला एअरबेस कार्यान्वित केला आहे. इराण सरकारविरुद्ध राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठी कारवाई करू शकतात. इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केले जातील अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

इराणचाही अमेरिकेला इशारा

इराणनेही अमेरिकेला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केला तर आजूबाजूच्या देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला जाईल, असे इराणने म्हटले आहे.

कैदेतील आंदोलकांना फाशी देण्याची शक्यता

आंदोलन करणारे नागरिक आणि पोलिसांमध्ये हिंसाचार सुरूच आहे. आतापर्यंत 2571 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इराणमधील अनेक मानवाधिकार कार्यकर्ते, आंदोलकांना तुरुंगात डांबले आहे. इराणचे कायदा मंत्री गुलाम हुसेन मोहसेनी-एजेई यांनी तुरुंगातील आंदोलकांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी आणि त्याची अंमलबजावणी करावी, असे म्हटले आहे. आंदोलकांना फाशीची शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.