
महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली तेव्हापासूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. आता भाजप नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवताना दिसत आहे. त्यामुळे मिंधेंना डिवचण्यासाठी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आल्याचा व्हिडीओ काही तासांपूर्वी व्हायरल झाला होता. आणि आता नेरूळमधील मिंधे गटाच्या कार्यलयाची भाजपकडून तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
Navi Mumbai Result 2026 – भाजपने मिंधेंना डिवचलं; टांगा पलटी घोडे फरार, शहरात झळकले पोस्टर
मिळालेल्या माहितीनुसार, नेरुळमधील मिंधे गटाच्या विजय माने यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे काही काळ नेरूळमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी मोठ्या संख्येने भाजप आणि मिंधे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने एकच गोंधळ उडाला होता. ताज्या आकडेवारीनुसार 111 जागांपैकी भाजप 66 जागांवर आघाडीवर असून मिंधे गट 41 जागांवर आघाडीवर आहे. या निकालाआधी भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी सारमाध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. ‘भाजपाने परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करून घोडेपण बेपत्ता करेन”, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले होते.





























































