
हिंदुस्थान आणि श्रीलंकेत होणाऱया आगामी टी-20 वर्ल्ड कपवरून मोठा वाद पेटला असून, बांगलादेशच्या सहभागावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आयसीसीचे एक शिष्टमंडळ थेट ढाक्यात जाऊन बांगलादेशशी चर्चा करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बांगलादेश सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, बांगलादेश क्रिकेट मंडळाचे (बीसीबी) अध्यक्ष अमिनुल इस्लाम (बुलबुल) यांनी ही माहिती दिली आहे. नवीन घडामोडीनुसार आयसीसीचे प्रतिनिधी चर्चेसाठी बांगलादेशात येऊ शकतात. मात्र आमच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
































































