
अंधेरी पश्चिम लोखंडवाला येथील ब्रिज इमारतीमधील निवासी इमारतीत शनिवारी सकाळी लागलेल्या आगीत एका 73 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हिरू चेतलानी असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान, ही आग कशी लागली याचा अग्निशमन दल आणि महापालिका अधिकारी तपास करीत आहेत.
लोखंडवाला हाई पॉईंट हॉटेलजवळील ब्रिज या सात मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. 402 मध्ये शनिवारी सकाळी 11.15 च्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. या सदनिकेत आग नेमकी कशी लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. बचावकार्य सुरू असताना अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीत एक वृद्ध महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली. तात्काळ या महिलेला पूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
























































