सामना अग्रलेख – हे म्हणे सुशासन आणणार?

शिवसेना-मनसेला बहुसंख्य मराठी जनतेने मतदान केले. भाजप व जयचंदाला मतदान करणाऱ्यांनी मुंबईच्या ‘डेथ वॉरंट’वर शिक्के मारले. महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांत या सगळ्यांची गणना होईल. पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘एनडीए’च्या जनहितकारी, सुशासनाच्या धोरणाला जनतेने आशीर्वाद दिले. सर्व गुंड-भ्रष्टाचारी, व्यभिचाऱ्यांना एकत्र करून सरकार व पक्ष बनवणारे सुशासनावर बोलतात तेव्हा काय बोलायचे? मुंबई महापालिकेचा कारभार याच ‘सुशासन’ पॅटर्नने चालवला गेला तर ती ऐतिहासिक इमारत माफिया आणि गुंडांचा अड्डा बनेल. सावधान!

पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील मनपा निवडणुकांत ‘एनडीए’ला विजय मिळवून दिल्याबद्दल जनतेला धन्यवाद दिले आहेत. राज्यातील उत्साही जनतेने ‘एनडीए’च्या सुशासनाला आशीर्वाद दिल्याच्या भावना श्री. मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. त्याच वेळी महाराष्ट्रातील ताज्या विजयाचे श्रेय भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. फडणवीस यांनी सत्तेचा योग्य वापर महापालिका निवडणुकांत केल्याने विजय मिळाला व त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. वास्तविक पालिकांचे सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस हे भाजपच्या एजंटांसारखेच वागत होते. त्यामुळे फडणवीस यांचा विजय सोपा झाला. मुंबईच्या निकालाकडे सगळय़ांचेच लक्ष होते. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा वगैरेंनी मुंबईत प्रचारास येण्याचे साहस दाखवले नाही. कारण भाजप हरण्याचीच भीती जास्त होती. त्यामुळे भाजप व शिंदे सेनेचा एकत्रित आकडा बहुमत दाखवत असला तरी त्यांच्याकडे फक्त चारचेच बहुमत आहे. शिवसेना, मनसे, काँग्रेस व ‘इतर’ मिळून पालिकेच्या सभागृहात शंभरच्यावर नगरसेवक विरोधी बाकांवर बसणार आहेत व हे ‘शंभर’ चारच्या तुटपुंज्या बहुमताला भारी पडतील. बहुमत हे पाऱ्याप्रमाणे चंचल असते. ते कधीही निसटेल अशी परिस्थिती आहे. म्हणून शिंदे गटाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना हॉटेलात ‘बंदी’ बनवून ठेवले असावे. प्रचंड सत्ता, पैसा, निवडणूक आयोग हाताशी असूनही भाजप-शिंदे यांना जेमतेम काठावरचे बहुमत मिळाले. जयचंद शिंदे यांनी शिवसेनेचे पन्नासावर नगरसेवक फोडले. ते बहुतांश पराभूत झाले. मराठी मुलुखात भाजप व ‘जयचंद’ शिंदेंचा पैसा व भाईगिरी चालली नाही. मुंबईत शिवसेना-मनसे युतीचा महापौर (कदाचित) बसणार नाही, पण मुंबईवर वर्चस्व मराठी माणसांचे म्हणजे ठाकरे बंधूंचेच राहिले. मुंबईतील सर्व मराठी पट्ट्यांत शिवसेना-मनसेचे उमेदवार विजयी झाले व

उपऱ्यांच्या मुलुखात भाजपला

जागा मिळाल्या. यात कसली आली चाणक्यगिरी? फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर नसते तर त्यांना हा निकाल घेणे शक्य होते काय? हातात राज्याची सत्ता नसेल तर विरोधी पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणे कठीण जाते असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे ते चुकीचे नाही. सत्ताधाऱ्यांच्या हाती प्रशासन, पोलीस, पैसा, सर्व काही असते व ‘मीच चाणक्य’ किंवा ‘धुरंधर’ हे हायकमांडला दाखवण्यासाठी अशा निवडणुका हायजॅक केल्या जातात. महाराष्ट्रात हेच सुरू आहे. ठाण्यात जयचंद शिंदे यांनी असा कोणता महान विचार जनतेला दिला, महान कार्य केले की, ज्यामुळे ठाण्यात त्यांच्या बोगस शिवसेनेला बहुमत मिळाले? कल्याण-डोंबिवली हे सांस्कृतिक सुशिक्षितांचे शहर मानले जाते. तेथील महानगरपालिकेत जयचंद शिवसेनेस 53 जागा मिळाल्या हे अनाकलनीय आहे. नवी मुंबई, उल्हासनगरात या जयचंदांना मिळालेल्या जागांचे आकडे पाहून पंतप्रधान मोदी त्यांच्या डिग्रीचे प्रमाणपत्र फाडून फेकतील. या निवडणुकीचे निकाल म्हणजे खोटेपणाचा कळस आहे. भारतीय जनता पक्षाला देशातील सर्वच सत्ता आपल्या हाती हवी आहे. अगदी हाऊसिंग सोसायट्या, क्रीडा मंडळे, गणेश मंडळांच्या निवडणुकाही ते पक्ष म्हणून लढतात. फक्त जय शहांना क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष केले ते कोणत्याही निवडणुकीशिवाय. सर्व सत्ता संस्था, संवैधानिक पदे त्यांनी आपल्या ताब्यात घेतली. मुंबई महापालिकेवर त्यांना इतक्या वर्षांत ताबा मिळवता आला नाही. या वेळी जयचंद शिंदेंच्या मदतीने मराठी माणसाची महापालिका त्यांनी ताब्यात घेतली. फडणवीसांच्या राज्यात एक महत्त्वाची घटना या निवडणुकीत घडली ती म्हणजे, ‘एआयएमआयएम’ची प्रचंड घोडदौड महाराष्ट्रात सुरू झाली. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह अनेक महानगरपालिकांत

एआयएमआयएमचे नगरसेवक

निवडून आले. हा आकडा शंभरावर आहे. त्यामुळे भाजपमध्ये खुशीची लहर आहे. एमआयएमचे निवडून येणे हीच फडणवीसांच्या राजकारणाची चाणक्य नीती आहे. मुस्लिम समाजाची मते काँग्रेसला न जाता ती ओवेसी पक्षाकडे वळावीत व त्यातून भाजपला राजकीय लाभ व्हावा अशी काही चाणक्य नीती पडद्यामागे घडली आहे काय? 29 पैकी 23 महापालिकांवर ‘महायुती’ म्हणून भाजपचा ताबा आला. वसई, लातूर, परभणी, चंद्रपूर, मालेगावात वेगळे निकाल लागले. कोल्हापुरात काँग्रेसच्या सतेज पाटलांनी भाजपची दमछाक केली. तेथे काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष आहे. चंद्रपुरात काँग्रेसचा विजयी पत्ता पडला. ज्या 23 महानगरपालिकांत विजयाचा झेंडा फडकला असे ‘नाचून’ सांगितले गेले त्यातल्या किमान 17 पालिकांत भाजप ‘कुबड्यां’वर अवलंबून आहे हे धुरंधरांच्या नावाने बॅण्ड वाजवणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. हातात प्रचंड सत्ता असलेल्या पक्षाला असे यश मिळाले नसते तरच आश्चर्य वाटले असते. निवडणूक आयोगाला भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरल्याने त्यांची मांजरे झाली आहेत. त्यामुळे मतदारांच्या तक्रारी व संतापाचे बोल त्यांच्या कानात जात नाहीत. पोलीस हे वर्दीतले भाजप कार्यकर्ते म्हणून कर्तव्यावर आहेत. या प्रतिकूल स्थितीतही ‘ठाकरे बंधू’ लढले. मराठी माणूस एकजुटीने त्यांच्या मागे उभा राहिला. शिवसेना-मनसेला बहुसंख्य मराठी जनतेने मतदान केले. भाजप व जयचंदाला मतदान करणाऱ्यांनी मुंबईच्या ‘डेथ वॉरंट’वर शिक्के मारले. महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांत या सगळ्यांची गणना होईल. पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘एनडीए’च्या जनहितकारी, सुशासनाच्या धोरणाला जनतेने आशीर्वाद दिले. सर्व गुंड-भ्रष्टाचारी, व्यभिचाऱ्यांना एकत्र करून सरकार व पक्ष बनवणारे सुशासनावर बोलतात तेव्हा काय बोलायचे? मुंबई महापालिकेचा कारभार याच ‘सुशासन’ पॅटर्नने चालवला गेला तर ती ऐतिहासिक इमारत माफिया आणि गुंडांचा अड्डा बनेल. सावधान!