मुंबईत उभारणार बिहार भवन! महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत भाजप-जेडीयू सरकारचा निर्णय

मुंबईत लवकरच 30 मजली ‘बिहार भवन’ उभे राहणार आहे. महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना बिहारमधील भाजप-जेडीयू सरकारने या भवनासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. नितीश कुमार सरकारने यासाठी 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

बिहारमध्ये सध्या भाजप व नितीश कुमार यांच्या जेडीयूची सत्ता आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच झाली. त्यात मुंबईतील बिहार भवन प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एल्फिन्स्टन इस्टेट येथे 0.68 एकर जमिनीवर हे भवन उभे राहणार आहे. या जागेच्या हस्तांतरणासाठी नितीश यांनी केंद्र सरकार व इतर परवानग्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता नितीश सरकारने आर्थिक तरतूद केली आहे.

दिल्लीतील बिहार भवनच्या धर्तीवर मुंबईत हे भवन बनवले जाणार आहे. कॅन्सरच्या उपचारासाठी बिहारमधून येणाऱया लोकांची येथे व्यवस्था केली जाणार आहे. तसेच सरकारी कामकाज व बैठकांसाठीही याचा वापर केला जाणार आहे.

असा असेल प्रकल्प

  • बिहार भवनची इमारत तळघरासह 30 मजली असेल.
  • इमारतीत एकूण 178 खोल्या.
  • 72 व्यक्ती बसतील इतक्या क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल असेल.
  • बिहारी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी 240 बेडचे शयनगृह असेल.
  • सेन्सरवर चालणाऱ्या स्मार्ट डबल व ट्रिपल पार्किंगची व्यवस्था असेल. त्यात 233 गाड्या पार्क करता येतील.
  • इन हाऊस कॅफेटेरिया, वैद्यकीय कक्ष व अन्य सुविधाही असतील.