
प्रयागराज येथील माघ मेळ्यात रविवारी मोठा राडा झाला. ज्योतीष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुत्तेश्वरानंद यांचा रथ पोलिसांनी रोखल्याने वादाला तोंड फुटले. शंकराचार्यांचे शिष्य आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट व धक्काबुक्की झाली. काही साधूसंतांना मारहाणही झाली. पोलिसांच्या या दंडेलीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मौनी अमावास्येचा मुहूर्त साधून अविमुत्तेश्वरानंद संगमावर स्नान करण्यास निघाले होते. त्यांचा रथ पोलिसांनी रोखला. मिरवणुकीसह संगमाच्या तटावर जाता येणार नाही. फक्त पाच लोकांनी जाऊन स्नान करावे, असे पोलिसांनी सांगितले. त्यातून वादाची ठिणगी पडली. अविमुत्तेश्वरानंदांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. शिष्यांसह स्नानाला जाण्यावर ते ठाम होते. त्यामुळे तणाव वाढला. पोलीस व अविमुत्तेश्वरानंदांच्या शिष्यांमध्ये झटापट झाली. ही माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी अविमुत्तेश्वरानंदांच्या 20 हून अधिक शिष्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी शिष्यांची पळापळ झाली. त्यात काही जण खाली पडले.
अविमुत्तेश्वरानंदांचा स्नानाला नकार
गोंधळ वाढत गेल्याने पोलिसांनी अविमुत्तेश्वरानंदांची पालखी संगमापासून एक किलोमीटर दूर नेण्यात आली. यावेळी पालखीचे छत्र तुटले. संतापलेल्या अविमुत्तेश्वरानंदांनी स्नान करण्यास नकार दिला. साधूसंतांचा अपमान व त्यांना मारहाण खपवून घेणे शक्य नाही असे म्हणत त्यांनी त्रिवेणी मार्गावर धरणे आंदोलन सुरू केले. या घटनेनंतर योगी सरकार व पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे.
शंकराचार्यांचा योगी सरकारवर आरोप
शंकराचार्य अविमुत्तेश्वरानंद यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ‘सरकारच्या सांगण्यावरूनच आमच्यासोबत हा प्रकार घडला आहे. कारण सरकार आमच्यावर नाराज आहे. महापुंभात चेंगराचेंगरी झाली होती, तेव्हा मी सरकारला जबाबदार धरले होते. त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनीच अधिकाऱयांना आदेश दिले असतील. त्यामुळेच आम्हाला त्रास दिला जात आहे,’ असे अविमुत्तेश्वरानंद म्हणाले.

























































