
लडाखचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर तुरुंगात अत्याचार करण्यात येत असून त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप सोनम यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी केला आहे.
सोनम वांगचुक यांना 26 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. लेहमध्ये राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीच्या मागणीसाठी झालेल्या हिंसक निदर्शनांच्या दोन दिवसांनंतर करण्यात आली होती. या निदर्शनांमध्ये चार लोकांचा मृत्यू झाला होता आणि 90 लोक जखमी झाले होते. यासंदर्भात एका मुलाखतीमध्ये गीतांजली यांनी सांगितले की, सोनम यांना तुरुंगात जमिनीवर ब्लँकेटमध्ये झोपावे लागत आहे. त्यांच्याकडे कोणतेही फर्निचर नाही. त्यांच्या बॅरेकमध्ये नीट फिरता येईल इतकीही जागा नाही. सोनम तुरुंगातील त्यांच्या अनुभवावर जे पुस्तक लिहीत आहेत त्याचे शीर्षक कदाचित ‘फॉरएव्हर पॉझिटिव्ह’ असेल. ते काही मुंग्या आणि त्यांचे वर्तन पाहत असावेत. ते मला मुंग्यांच्या वर्तनावर पुस्तके आणायला सांगतात, असे गीतांजली म्हणाल्या.
गीतांजली यांनी मांडलेले मुद्दे
राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला पाच ते दहा दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे दिली पाहिजे. परंतु वांगचुक यांना आवश्यक व्हिडीओ 28 व्या दिवशी देण्यात आले. ज्या पाच एफआयआरचा उल्लेख करण्यात आला आहे त्यापैकी तिघांमध्ये वांगचुक यांचे नाव नाही. दोन एफआयआरमध्ये नाव आहे, त्यापैकी 1 ऑगस्ट 2025 ची आहे. त्यात नोटीसही दिलेली नाही किंवा चौकशीही झालेली नाही, असे गीतांजली यांनी म्हटले आहे.

























































