भिवंडीत भाजप आमदाराच्या समर्थकांनी केला माजी महापौरांच्या घरावर हल्ला; दगडफेक, पोलिसांचा लाठीमार, दोघे जखमी

भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता हाणामारी सुरू केली आहे. भाजपचे स्थानिक आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित यांचा पराभव झाल्याने संतप्त समर्थकांनी आज रात्री उशिरा कोणार्प विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर तुफान हल्ला केला. पाटील यांच्या घरावर दगडफेक करीत त्यांच्या कारच्या काचादेखील पह्डल्या. या हल्ल्यात माजी महापौर प्रतिभा पाटील यांच्यासह दोघेजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे भिवंडीत प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी लाठीमार केला .

प्रभाग क्रमांक एकमध्ये विलास आर पाटील यांचा मुलगा मयूरेश पाटील यांनी मित चौघुले याचा पराभव केल्यानंतर मागील दोन दिवसांपासून वातावरण तंग झाले होते. आज थेट माजी महापौरांच्या घरावरच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यावेळी काही कार्यकर्त्यांवर चापूचे वार करण्यात आले. त्यानंतर विलास पाटील यांच्या समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर बसून आंदोलन केले. त्याच वेळी समोर असलेल्या आमदार महेश चौघुले यांच्या कार्यालयात मोठा जमाव जमला.

दोन्ही गटाच्या समर्थकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. आमदार महेश चौघुले यांच्या कार्यालयातून दगडफेक,सोडा वॉटर बॉटल व बल्ब यांचा मारा करण्यात आला. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

पोलीस भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप
विलास पाटील यांनी आमदार महेश चौघुले व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. निजामपूर पोलिसांनी सुरुवातीपासून भाजपच्या बाजूने काम करीत आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध करीत मुख्यमंत्री त्याला पाठीशी घालीत असल्याचा आरोप विलास पाटील यांनी केला आहे.