
इंडोनेशियामध्ये 11 लोकांना घेऊन जाणारे एक लहान प्रवासी विमान शनिवारी रडारवरून गायब झाले होते. ते कोसळले असून विमानाचा मलबा सुलावेसी बेटाजवळच्या डोंगरावर आढळला आहे. आता बचाव पथकांकडून शोधमोहीम राबवण्यात येत असून कोणी बचावला आहे का, याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
हेलिकॉप्टरमधून गेलेल्या पथकाला आज सकाळी विमानाचा मलबा दिसून आला. त्यांना सुरुवातीला विमानाची तुटलेली खिडकी दिसली. त्यानंतर त्या भागात जमिनीवर शोधमोहीम राबवण्यात आली. या पथकाला विमानाची शेपटी व आणखी काही अवशेष आढळले. दाट धुके, सोसाटय़ाचा वारा आणि डोंगराळ भाग असल्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. अपघातग्रस्त विमान शनिवारी जावा बेटावरील योग्याकार्ता येथून सुलावेसी बेटावरील मावासरकडे जात होते. विमान डोंगराळ भागात पोहोचताच त्याचा ग्राऊंड कंट्रोलशी संपर्क तुटला होता. चालक दलाचे 8 सदस्य आणि 3 प्रवासी होते.
लँडिंगपूर्वी संपर्क तुटला
इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्त्या एंडाह पुर्नामा सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई वाहतूक नियंत्रणाने विमानाला लँडिंगपूर्वी त्याचे अप्रोच अलाइनमेंट दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर लगेचच रेडिओ संपर्क तुटला. यानंतर कंट्रोल टॉवरने आपत्कालीन डिस्ट्रेस फेज घोषित केला. उंच डोंगररांगांमुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. विमान स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.17 वाजता (स्थानिक वेळेनुसार) दक्षिण सुलावेसी प्रांतातील मारोस जिह्यातील लेआंग-लेआंग परिसरात शेवटचे रडारवर दिसले होते. हा परिसर डोंगराळ आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे.


























































